(रत्नागिरी)
तालुक्यातील जयगड येथील जिंदल उद्योग समूहाच्या माध्यमातून अंबूवाडीफाटा, नांदिवडे या ठिकाणी उभे राहत असलेल्या गॅस टर्मिनलला ग्रामस्थांचा विरोध असून, प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समितीने १४ एप्रिलपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले होते. कंपनी प्रशासनाकडून दि. १६ रोजी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत २५ रोजी बैठक घेऊन चर्चा करण्याचे व या कालावधीत टर्मिनल उभारण्याचे काम तात्पुरते स्थगित ठेवण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. यामुळे ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे.
तालुक्यातील जयगड येथील जिंदल उद्योग समूहाच्या माध्यमातून अंबूवाडीफाटा, नांदिवडे या ठिकाणी उगे राहत असलेल्या गॅस टर्मिनलमुळे परिसर प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे हा प्रकल्प लोकवस्तीतून स्थलांतरीत करावा, या मागणीसाठी नांदिवडे प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून ग्रामस्थ १४ एप्रिलपासून गॅस टर्मिनल शेजारी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन स्थळी भेट देऊन ग्रामस्थांना पाठिंबा दिला होता. ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, युवासेना तालुका प्रमुख तथा शहर संघटक प्रसाद सावंत, उपतालुकाप्रमुख सुभाष रहाटे, विजय देसाई, विभाग प्रमुख किरण तोडणकर, संतोष हळदणकर, सज्जन लाड आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रहार संघटनेच्या काजल नाईक आणि आनंद त्रिपाठी यांनीही ग्रामस्थांना पाठिंबा दर्शवला होता.
जेएसडब्लू पोर्ट लिमिटेड कंपनी प्रशासनाकडून बुधवार दि. १६ रोजी आंदोनकर्त्यांना लेखी आश्वासन देण्यात आले. यामध्ये दि. २५ एप्रिल रोजी प्रदूषण विरोधी संघर्ष समितींसोबत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल. सद्भावना म्हणून दि. २५ रोजीपर्यंत टर्मिनल उभारणीचे काम तात्पुरते स्थगित करत आहोत. सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक कामे आवश्यकतेनुसार सुरू राहतील, असे नमूद करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी कोणत्या केल्यात मागण्या?
सुरू असलेल्या गॅस टर्मिनलचे काम तत्काळ थांबवावे. हे गॅस टर्मिनल लोकवस्तीतून स्थलांतरीत करावे. एनर्जी प्लांटच्या माध्यमातून साठवणूक करत असलेल्या राखेचा त्रास स्थनिक नागरिकांना होऊ नये यासाठी तत्काळ उपाययोजना करावी, परिसरातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत पुनर्जिवित व शाश्वत करावे. कंपनीच्या माध्यमातून निर्माण झालेले उर्जा हॉस्पिटल अद्ययावत करून परिसरातील नागरिकांना मोफत उपचार द्यावे, निवळी-जयगड रोडवरील कंपनीची बंद पडलेली वाहने बाजूला करून वाहतूक सु-नियोजित करण्यासाठी २४ तास एक क्रेन उपलब्ध ठेवावी, रोजगाराच्या दृष्टीकोनातून स्थानिक मुलांना टेक्निकल ट्रेनिंग उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. व्यावसायिक दृष्टिकोनातून येथील तरुणांना प्राधान्य द्यावे. सीएसआर डिपार्टमेंटमध्ये स्थानिक मुलांची नेमणूक करावी, अशा मागण्या ग्रामस्थांकडून करण्यात आल्या आहेत.