( चिपळूण / वार्ताहर )
केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मांडकी-पालवण येथील गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित या दोन्ही महाविद्यालयांत राज्यव्यापी ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. हे अभियान १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सुरू आहे.
कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी श्री. मनोज गांधी, उपकृषी अधिकारी श्री. विकास पिसाळ आणि ‘आत्मा’चे बी.टी.एम. श्री. पंकज कोरडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आणि कृषी आधारित उद्योगांना चालना देणे यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, अनुदाने आणि प्रशिक्षण उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली.
उपकृषी अधिकारी श्री. विकास पिसाळ यांनी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, कांदा चाळ, शेडनेट हाऊस, हरितगृह, सामूहिक शेततळे, प्लास्टिक मल्चिंग, ड्रॅगन फ्रूट लागवड, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन आणि आंबा लागवड अनुदान या योजनांचा समावेश होता. तसेच प्रक्रिया, साठवणूक व पायाभूत सुविधा, शीतगृह, फार्म गेट पॅक हाऊस, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि पशूखाद्य उत्पादन उद्योग यांसारख्या कृषीपूरक उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.
ठिबक सिंचन, तुषार सिंचन, कृषी यांत्रिकीकरण योजना, शेतकरी सुरक्षा व आर्थिक मदत, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना, महिला शेतकरी ओळखपत्र, प्रधानमंत्री पीक विमा योजना, हवामान आधारित फळपीक विमा योजना आणि पीएम किसान सन्मान निधी यांसारख्या योजनांची माहितीही यावेळी देण्यात आली. याशिवाय प्रशिक्षण व शाश्वत शेती, मधुमक्षिका पालन प्रशिक्षण आणि नैसर्गिक शेती या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे आणि उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी यांच्यासह दोन्ही महाविद्यालयांतील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आर्या गायकवाड यांनी केले. कु. जिज्ञासा सांबारे यांनी प्रास्ताविक केले, तर कु. प्राजक्ता कुंभार यांनी आभार प्रदर्शन केले. या उपक्रमामुळे केंद्र व राज्य शासनाच्या कृषीविषयक योजनांची माहिती विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास मदत झाली.


