(रत्नागिरी / प्रतिनिधी)
आषाढ पौर्णिमेचे औचित्य साधत तथागत भगवान बुद्ध यांच्या पवित्र वर्षांवास परंपरेनिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यात तीन महिन्यांच्या धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, २९ जुलैपासून सुरू होणारी ही मालिका अश्विन पौर्णिमा, २६ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार असून, बुद्ध धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि सामाजिक प्रबोधन या केंद्रस्थानी ठेवून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्याच्या कार्यक्रमपत्रिकेनुसार भारतीय बौद्ध महासभा, रत्नागिरी जिल्हा शाखा (संस्कार विभाग) यांच्या नियोजनातून सर्व तालुका शाखांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वर्षांवास कालावधीत धम्मप्रसारासोबतच सामाजिक जागृती, वैचारिक प्रबोधन आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा व्यापक प्रचार-प्रसार करण्यावर भर दिला जाणार आहे. या धम्म प्रवचन मालिकेचा शुभारंभ बुधवार, २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, रत्नागिरी येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कार विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव राहणार असून, उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य संस्कार विभागाचे सचिव अनंत सावंत यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमात ज्येष्ठ अभ्यासक एन. बी. कदम यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असून प्रदीप जाधव, अल्पेश सकपाळ, विकास पवार आणि विजय कांबळे हे धम्मप्रवचनाद्वारे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. तालुका अध्यक्ष सुनील पवार, राहुल मोहिते, सुभाष जाधव, आर. बी. कांबळे, जयरत्न कदम, विद्याधर कदम, अरुणकुमार मोरे, अनिल घाडगे, हर्षद जाधव यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी, बौद्धाचार्य, श्रामणेर, केंद्रीय शिक्षक-शिक्षिका, सैनिक तसेच उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
वर्षांवास कालावधीत दर आठवड्याला विविध विषयांवर प्रवचने आयोजित करण्यात आली आहेत. विश्वगुरू तथागत भगवान बुद्ध, भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत, बौद्ध लेणी व शिलालेख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय स्वातंत्र्य, प्रतीत्यसमुत्पाद, अनात्म व दुःख, महाबोधी महाविहाराचा इतिहास, चार ब्रह्मविहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य, बोधिसत्त्व संकल्पना, माता रमाई यांचे व्यक्तिमत्त्व, बुद्ध धम्माची वैशिष्ट्ये, धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व, भारतीय संविधान आणि बौद्ध धम्म व मानवता अशा एकूण २० महत्त्वपूर्ण विषयांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या संपूर्ण कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांना जिल्ह्यातील बौद्धाचार्य, श्रामणेर, केंद्रीय शिक्षक-शिक्षिका, सैनिक, उपासक-उपासिका तसेच बौद्ध समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्मप्रबोधनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

