(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील ओरी केंद्र शाळा नंं.१ या शाळेला पुणे येथील श्री समर्थ मित्र मंडळ सुतारवाडी पुणे यांच्यामार्फत सुमारे दहा हजार रुपये किमतीचे विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्य देण्यात आले आहे.
सदरच्या साहित्याचे वितरण श्री समर्थ मित्र मंडळ सुतारवाडी यांची प्रतिनिधी श्री. खेमराज रणपिसे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे धडाडीचे अध्यक्ष संकेत देसाई, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष वसंत जाधव,शाळेचे मुख्याध्यापक धनंजय आंबावकर, पदवीधर शिक्षिका सौ.समिक्षा पवार, रामदास चव्हाण, गणपती पडुळे यांसहित लाभार्थी विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थी जीवनात खेळाला अत्यंत महत्त्व असून निरोगी जीवनासाठी खेळ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मुक्तहस्ते मुलांनी खेळावे, अभ्यासाबरोबरच खेळायचे कौशल्य अवगत करावे, शारीरिक आणि मानसिक सक्षमतेसाठी खेळ महत्त्वाचे आहेत, आपापल्या आवडीप्रमाणे खेळ खेळा, असे आवाहन देणगीदार श्री. रणपिसे यांनी केले.
देणगीदारांचा परिचय व स्वागत, पालक संघाचे वसंत जाधव आणि शाळा व्यवस्थापन समितीचे संकेत देसाई यांनी केले. आभार शाळेतील पदवीधर शिक्षिका सौ.समिक्षा पवार यांनी मानले .क्रिकेट साहित्यासह बॅडमिंटन, लगोरी,वफुटबॉल अशा सर्व प्रकारचे आवश्यक ते दर्जेदार क्रीडा साहित्य मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी खूपच आनंद व्यक्त केला.