(रत्नागिरी / वार्ताहर)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी आणि सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने एनसीडीसी – सी बी बी ओ – एफ एफ पी ओ – रायगड या प्रकल्पांतर्गत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून २ ऑक्टोबर २०२६ रोजी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथील परिषद दालनात ‘आधुनिक मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत सुमारे ६० प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून कांदळवण कक्ष, मुंबईचे मुख्य वनसंरक्षक श्री. एन. आर. प्रवीण, रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल श्री. प्रशांत निकाळजे, अलिबागच्या सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी श्रीमती प्रियांका पाटील, कांदळवन कक्ष, मुंबईचे प्रमुख श्री. विक्रांत यादव, श्री. दशरथ आणि हरणे कांदळवन कक्षाचे सदस्य फहाद जमादार उपस्थित होते.
मत्स्य व्यवसायात केवळ ताज्या माशांची विक्री करण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून अधिक बाजारमूल्य असलेले पदार्थ तयार करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने कार्यशाळेत विविध नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थांच्या निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. मत्स्य महाविद्यालयाचे विद्यार्थी अनिरुद्ध शारंगधर आणि रोहित आपटे यांनी कोळंबी पफ, कोळंबी पराठा आणि समुद्री शेवाळयुक्त कुकीज यांसारखे पदार्थ तयार करण्याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण दिले. तर मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी फिश रशियन कटलेट या पदार्थाच्या निर्मितीविषयी मार्गदर्शन केले.
मत्स्य उत्पादनांवर आधुनिक प्रक्रिया तंत्रज्ञानाचा वापर करून विविध मूल्यवर्धित आणि पौष्टिक खाद्यपदार्थ तयार करण्याचे कौशल्य या कार्यशाळेतून सहभागी प्रशिक्षणार्थींना मिळाले. यामुळे मत्स्य उत्पादनांचा योग्य वापर, प्रक्रिया, साठवणूक आणि बाजारपेठेतील मूल्यवृद्धी यांना चालना मिळण्याबरोबरच रोजगारनिर्मितीच्या संधीही वाढण्यास मदत होणार आहे.
या प्रशिक्षणात करंजा हार्बर मत्स्य शेतकरी उत्पादक संस्था, रायगडच्या १२ संचालक मंडळ सदस्यांसह शिरगाव येथील क्रांती महिला प्रभागाच्या महिला सदस्य सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापक श्रीमती मयुरी डोंगरे यांनी केले. मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
‘मासे म्हणजे केवळ विक्रीचे उत्पादन नव्हे, तर मूल्यवर्धित उद्योगाचे प्रभावी माध्यम आहे,’ हा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला. मत्स्य उत्पादनांवर प्रक्रिया करून नाविन्यपूर्ण पदार्थ तयार करण्याच्या कौशल्याला प्रोत्साहन देत मत्स्य क्षेत्रातील उद्योजकतेला चालना देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.


