(चिपळूण/ रत्नागिरी प्रतिनिधी)
संपूर्ण चिपळूण शहराला हादरवून सोडणाऱ्या वालोपे रेल्वे स्थानक परिसरातील नवनाथ बबन कांबळे हत्याकांड प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठे यश लागले आहे. तांत्रिक तपासाचे जाळे विणत कोल्हापुरातून अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी पवन आंबेडे याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कोठडीदरम्यान निर्घृण हत्येमागील नेमके कारण काय होते आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
वालोपे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सांगलीतील तरुण कामगार नवनाथ बबन कांबळे (वय ३३) याचा डोक्यात जांभा दगड घालून अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला होता. या घटनेनंतर मारेकरी पसार झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, चिपळूण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत हे आव्हान स्वीकारले. घटनेनंतर तपासाचा कोणताही ठोस पुरावा नसताना चिपळूण पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल कॉल डिटेल्सचे (सीडीआर) बारकाईने विश्लेषण केले. या तांत्रिक तपासातून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागताच, पोलिसांनी कोल्हापूर येथे सापळा रचून संशयित आरोपी पवन आंबेडे याच्या मुसक्या आवळल्या. या क्लिष्ट गुन्ह्याची यशस्वी उकल केल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाच्या कामगिरीची दखल घेत त्यांना ३० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करून गौरवले आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोटापाण्यासाठी आलेल्या निष्पाप कामगाराचा इतक्या निर्दयीपणे जीव का घेतला गेला, यामागे नेमके कोणते वैमनस्य किंवा कारण होते आणि गुन्हा नेमक्या कोणत्या परिस्थितीत घडला, याची कसून चौकशी पोलीस करणार आहेत. या पोलीस कोठडीत आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


