(रत्नागिरी)
रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे एमआयडीसी परिसरात असलेल्या ‘फ्रिलान्स फिश मिल अँड ऑईल प्रा. लि.’ या कंपनीत काम करणाऱ्या एका परप्रांतीय कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना २६ डिसेंबर रोजी उघडकीस आली. मृत कामगाराचे नाव जयराम गणाराम राजबोंगशी (वय ४८, रा. घोंगापार, तामलपूर, बक्सा, आसाम) असे आहे. तो मिरजोळे येथील संबंधित कंपनीत काम करत होता आणि कंपनीच्या आवारातच त्याचे वास्तव्यास होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २६ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सहकारी कामगार दिपज्योती करूणा दास यांनी जयराम राजबोंगशी यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर कंपनीचे सुपरवायझर निखील विश्वास लाड यांनी घटनास्थळी पाहणी केली असता जयराम निपचित अवस्थेत आढळून आले.
त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती दुपारी १.२५ वाजता त्यांना मृत घोषित केले.
या घटनेप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद क्रमांक १०१/२०२५ करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

