(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरानजीकच्या अत्यंत गजबजलेल्या कुवारबाव परिसरातील ब्रिज क्रमांक दोन खाली एका अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. मृतदेहाची अवस्था पाहता तो अनेक दिवसांपासून तेथे पडून असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे रत्नागिरी शहर पोलिसांची नियमित गस्त, निर्जन ठिकाणांवरील देखरेख आणि संशयास्पद हालचालींवरील नियंत्रण नेमके किती प्रभावी आहे, याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पोलिसांच्या गस्तीची प्रभावी अंमलबजावणी होते का?
कुवारबाव परिसरातील मैलाचा दगड क्रमांक २०७/१४ आणि २०७/१६ यांच्या दरम्यान ब्रिज क्रमांक दोनच्या खाली सुमारे ५० ते ६० फूट अंतरावर हा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीचे नाव, गाव आणि वय अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, मृतदेह कुजण्याइतका कालावधी उलटूनही तो नियमित पोलीस गस्तीच्या वेळी निदर्शनास कसा आला नाही, हा कळीचा प्रश्न आहे. पुलांखालच्या आणि आडोशाच्या जागांची पोलिसांकडून नियमित पाहणी केली जाते की नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मृत व्यक्ती नेमकी कोण आहे, तो स्थानिक रहिवासी आहे की बाहेरगावाहून आलेला, याचा शोध घेणे पोलिसांसमोरील पहिले आव्हान आहे. तसेच हा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला की त्यामागे काही घातपात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने मृत्यूची नेमकी वेळ आणि कारण निश्चित करण्यासाठी वैद्यकीय अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अनोळखी मृतदेह सापडल्यानंतर केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपासाची औपचारिकता पूर्ण केली जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासणे, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करणे आणि मृत्यूच्या परिस्थितीचा सखोल तपास करणे गरजेचे आहे. कुवारबावसारख्या वर्दळीच्या भागालगत घडलेल्या या घटनेनंतर शहर पोलीस आपल्या गस्तीच्या कार्यपद्धतीत काय सुधारणा करतात आणि या मृत्यूचे गूढ कधी उकलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


