(रत्नागिरी /प्रतिनिधी)
महामार्गाच्या कामात नियोजनशून्य आणि बेजबाबदार कारभाराचा कळस गाठणाऱ्या ‘रवी इन्फ्रा बिल्ड’ कंपनीच्या आणखी एका जीवघेण्या निष्काळजीपणाने आज (सोमवारी) सायंकाळी एका निष्पाप सायकलस्वाराचा बळी घेतला. रत्नागिरी शहरातून कुवारबावकडे जाणाऱ्या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर टीआरपी येथील हिरो शोरूमसमोर कंपनीच्या अवाढव्य ‘ग्रेडर’ यंत्राच्या चाकाखाली चिरडून ५० वर्षीय सायकलस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. रघुनाथ बाबी झोरे (वय ५०, मूळ रा. वेतोशी, ता. जि. रत्नागिरी) असे या मृत सायकलस्वाराचे नाव असून, अपघातानंतर या महाकाय यंत्राचा चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. या घटनेमुळे ‘रवी इन्फ्रा’ कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आज (दि. २३ नोव्हेंबर) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अंगावर काटा आणणारा अपघात घडला. शहरातून कुवारबावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सायंकाळी मोठी वाहतूक आणि पादचाऱ्यांची वर्दळ असते. अशा भरगच्च गर्दीच्या वेळी रस्ते बांधणीसाठी वापरण्यात येणारे भव्य ‘ग्रेडर’ यंत्र कोणतीही सुरक्षा उपाययोजना किंवा मदतनीस (क्लिनर) नसताना बेदरकारपणे रस्त्यावरून नेले जात होते. यावेळी तेथून जाणारे सायकलस्वार रघुनाथ झोरे हे या अवजड यंत्राच्या चाकाखाली सापडले. ग्रेडरचे भव्य चाक थेट अंगावरून गेल्याने झोरे यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात घडताच संबंधित ग्रेडर चालकाने जखमीला मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून धूम ठोकली. सायंकाळच्या वेळी मुख्य मार्गावर हा थरार घडल्याने टीआरपी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम करणाऱ्या ‘रवी इन्फ्रा बिल्ड’ कंपनीचा कारभार रत्नागिरीकरांच्या जीवावर उठला आहे. काही दिवसांपूर्वीच खेडशी येथे कंपनीच्या नियोजनशून्य ‘डायव्हर्जन’मुळे एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी झाला होता. दिशादर्शक फलकांशिवाय रस्ते वळवणे, अनधिकृत ओपनिंग ठेवणे आणि आता तर चक्क भरवस्तीत व सायंकाळच्या वर्दळीच्या वेळी सुरक्षा रक्षकांशिवाय अवाढव्य यंत्रसामग्री रस्त्यावर फिरवणे, असा जीवघेणा खेळ या कंपनीकडून सुरू आहे. केवळ नफा कमावण्याच्या नादात सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या या मुजोर ठेकेदार कंपनीवर प्रशासन नेमकी कधी कठोर कारवाई करणार आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.


