(रत्नागिरी / प्रतिनिधी)
प्रस्तावित समान नागरी कायद्याबाबत मुस्लिम समाजाच्या धार्मिक आणि वैयक्तिक कायद्यांशी संबंधित चिंतेला घटनात्मक चौकटीतून वाचा फोडत, जमीयत उलमा-ए-हिंद आणि मुस्लिम समाज विकास संघाच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. समान नागरी कायद्याला विरोध, पंतप्रधानांच्या १५ कलमी अल्पसंख्याक कल्याण कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी आणि १८ डिसेंबरचा अल्पसंख्याक दिवस शासकीय स्तरावर साजरा करणे, या तीन प्रमुख विषयांवर शिष्टमंडळाने स्वतंत्र निवेदने सादर केली. अल्पसंख्याकांच्या प्रलंबित प्रश्नांवर मुख्यमंत्री स्तरावरही पाठपुरावा करण्याची ग्वाही सामंत यांनी दिली.
२१ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत जमीयत उलमा-ए-हिंदच्या वतीने मुफ्ती तौफिक मंसुरी, तर मुस्लिम समाज विकास संघाचे सचिव महमंद हुसैन मूसा यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. यावेळी सुमारे ५० ते ६० पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील प्रतिनिधींनीही आपल्या भागातील प्रश्न मांडले. प्रस्तावित समान नागरी कायद्याला मुस्लिम समाजाची तयारी नसल्याचे स्पष्ट करीत, मुस्लिम वैयक्तिक कायद्यांची जागा घेणाऱ्या सक्तीच्या समान नागरी कायद्याला संघटनांनी सविनय विरोध दर्शविला. कायद्याचा अधिकृत मसुदा अद्याप तयार झालेला नसताना उपलब्ध माहितीनुसार तो इस्लामच्या मूलभूत धार्मिक तत्त्वांशी विसंगत ठरू शकतो, अशी चिंता निवेदनातून व्यक्त करण्यात आली.
संविधानातील अनुच्छेद २५, २६ आणि २९ अन्वये धार्मिक स्वातंत्र्य, धार्मिक संस्थांचे व्यवस्थापन तसेच सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कांचे संरक्षण करण्यात आले आहे. या घटनात्मक तरतुदींच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाच्या वैयक्तिक नागरी कायद्यांनाही आवश्यक संरक्षण आणि सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. अनुसूचित जाती-जमातींच्या पारंपरिक रूढी आणि प्रथांच्या संदर्भातील घटनात्मक संरक्षणाचा दाखलाही यावेळी देण्यात आला. या मागणीचे समर्थन करणारी सविस्तर पुरवणी निवेदनासोबत जोडण्यात आली.
अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि रोजगारविषयक विकासासाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधानांच्या १५ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणले. रत्नागिरी जिल्ह्यात मुस्लिमांसह अन्य अल्पसंख्याक समुदायांच्या विकासासाठी स्वतंत्र आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात २३ कलमी स्वतंत्र निवेदन सादर करून संबंधित विभागांना ठोस कार्यवाहीचे निर्देश देण्याची विनंती करण्यात आली.
१८ डिसेंबर हा अल्पसंख्याक हक्क दिवस शासकीय स्तरावर साजरा करण्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. मागील वर्षी यासंदर्भात निर्णय होऊनही त्याची अपेक्षित अंमलबजावणी झाली नसल्याकडे शिष्टमंडळाने लक्ष वेधले. यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी अल्पसंख्याक म्हणजे केवळ मुस्लिम समाज नव्हे, तर मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी आणि जैन या सहा धार्मिक समुदायांचा त्यामध्ये समावेश होतो, असे स्पष्ट केले.
यंदा या सहाही समुदायांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करून शासकीय निर्देशांनुसार १८ डिसेंबरचा अल्पसंख्याक दिवस साजरा करण्यात येईल. या कार्यक्रमाला आपण स्वतः उपस्थित राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले. संबंधित अन्य प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठीही प्रयत्न करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिष्टमंडळाने मांडलेल्या मागण्या आणि आक्षेप पालकमंत्र्यांनी ऐकून घेतले. समान नागरी कायद्याचा मसुदा अद्याप तयार नसल्याने सोशल मीडियावरील अपुऱ्या माहितीवरून गैरसमज पसरविण्याऐवजी संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून भूमिका मांडावी, असे आवाहन त्यांनी केले. २२ नोव्हेंबर रोजी कोकण भवन येथे होणाऱ्या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होऊन शिष्टमंडळाने आपली बाजू मांडावी, अशी सूचना त्यांनी केली. आवश्यकतेनुसार मुख्यमंत्री आणि वरिष्ठ मंत्र्यांची भेट घडवून आणण्याची तयारीही दर्शविली.
या बैठकीला अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि प्रांताधिकारी जीवन देसाई उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते सुहेल मुकादम यांनी बैठकीचे नियोजन केले होते. लांजा, रत्नागिरी, देवरूख, संगमेश्वर आणि चिपळूणसह विविध तालुक्यांतील प्रतिनिधींचा सहभाग होता. बैठकीची माहिती मुस्लिम समाज विकास संघाचे जिल्हा सचिव महमंद हुसैन मूसा यांनी दिली. धार्मिक स्वातंत्र्य, अल्पसंख्याकांचे विकासविषयक प्रश्न आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी या तीनही मुद्द्यांवर झालेली ही चर्चा आता प्रत्यक्ष प्रशासकीय कार्यवाहीत कितपत उतरते, याकडे जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाचे लक्ष लागले आहे.


