(जैतापूर/ वार्ताहर)
यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह नेहमीच मुसळधार पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोकणातही भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. राजापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळी वाढवण्यासाठी आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी पुढाकार घेतला असून, कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन वनराई बंधारे उभारण्याच्या सूचना केल्या आहेत. पाणी बचतीसाठी व्यापक नियोजन करत या मोहिमेवर ते स्वतः लक्ष ठेवणार आहेत.
या पार्श्वभूमीवर राजापूर येथील शिवसेना पक्ष कार्यालयात तालुकाप्रमुख दीपक नागले यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत संभाव्य पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. आमदार किरण सामंत यांच्या संकल्पनेतून ‘एक ग्रामपंचायत, एक वनराई बंधारा’ ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेअंतर्गत तालुक्यात तब्बल १०१ वनराई बंधारे उभारण्याचा संकल्प शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
बैठकीत केवळ नियोजनावर चर्चा न करता बंधारे उभारण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवातही करण्यात आली आहे. या उपक्रमात शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे श्रमदान करत आहेत. मोहिमेतील सहभाग, सुरू असलेली कामे आणि त्यांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा आमदार किरण सामंत वेळोवेळी घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या बैठकीला शिवसेनेचे महिला तालुकाप्रमुख, युवासेनेचे तालुकाप्रमुख, महिला शहरप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक तसेच अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी वनराई बंधाऱ्यांच्या उभारणीवर भर देण्यात येत असून, आमदार किरण सामंत यांचे नियोजन आणि कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग यामुळे राजापूर तालुक्यात पाणीटंचाईवरील उपाययोजनांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


