(संगमेश्वर / एजाज पटेल)
फुणगुस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनागोंदी आणि ढिसाळ कारभाराविरोधात डिंगणीचे ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा भाजपचे तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम यांनी थेट आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य राकेश जाधव त्यांच्या मदतीला धावले आणि आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली. अखेर जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी धाव घेऊन सर्व मागण्या मान्य करून लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. येत्या 7 दिवसात जर कार्यवाही झाली नाही तर पुन्हा उपोषण सुरू करण्याचा इशारा मिथुन निकम यांनी दिला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्र हे खाडी भागातील सुमारे १८ गावासाठी सेवा देणारे शासकीय आरोग्य केंद्र आहे. तसेच ४उपकेंद्र देखील आहेत. परंतु उपकेंद्र किती दिवस सुरू आणि किती बंद याकडे आरोग्य विभागाचेच लक्ष नाही. आणि फुणगुस प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार तर रामभरोसे सुरू आहे. दोन डॉक्टर असून देखील एकही डॉक्टर रात्री हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नसतो. तर लसीकरण मोहिमेचे अक्षरशः तीनतेरा वाजलेले आहेत. फिरती सेवा तर येथे कालबाह्य झाली आहे. आरोग्य केंद्रात रुग्णांना मिळणारी वागणूक “भीक नको पण कुत्रा आवर” अशी झालेली आहे. या सर्व तक्रारींची दखल डिंगणीचे उपसरपंच आणि भाजपचे तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम यांनी घेतली आणि थेट आरोग्य विभागाविरोधात एल्गार पुकारला.
जिल्हा आरोग्य विभागाला उपोषणाचा इशाराच नव्हे तर गांधी जयंतीचे औचित्यसाधून आमरण उपोषणाची नोटिसच दिली. त्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागे होत धावपळ उडाली. फोनाफोनी आणि मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले. पण त्याचवेळी भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य आणि संगमेश्वर तालुक्यातील आक्रमक नेतृत्व राकेश जाधव यांनी या प्रकरणात उडी घेतली आणि मिथुन निकम यांच्या उपोषणाला आंदोलनाचे स्वरूप मिळाले. भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष स्वप्नील सुर्वे तसेच स्थानिक ग्रामस्थ देखील धावून आले.
अखेर जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री.मोरे यांनी उपोषणस्थळी धाव घेतली आणि समर्पक चर्चा केली. राकेश जाधव यांनी आरोग्य यंत्रणेला धारेवर धरत दोन डॉक्टर असून देखील मुख्यालयात एकही डॉक्टर उपलब्ध नाही, हे का व कसे होते.? तसेच लसीकरणाचा अहवाल द्या, उपकेंद्र किती सुरू आहेत, आणि तिथे कोण कर्मचारी राहतात याचा अहवाल समोर आणा, फिरती मोहीम, गरोदर महिला संगोपम, सुविधा, क्षयरुग्ण मोहीम, कुपोषण मोहीम, शासनाच्या किती मोहीम येथे राबवल्या जातात त्याची माहिती तरी द्या, अशा प्रश्नांची सरबत्ती मिथुन निकम व राकेश जाधव यांनी केल्यानंतर आरोग्य प्रशासन जणू हतबल झाले.
सोडणार नाही, या आरोग्य केंद्राची हद्द धामणीपर्यंत आहे, लक्षात ठेवा, संगमेश्वरातून बाहेर पडायला देणार नाही, अशी अत्यंत आक्रमक भूमिका राकेश जाधव आणि उपोषणकर्ते मिथुन निकम यांनी यावेळी घेतली. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्व मागण्या मान्य करत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु फक्त आश्वासन नको, लेखी पत्र द्या, आणि तेही आताच हवे, अशी मागणी मिथुन निकम यांनी केली.
त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांनी कामचुकार व लसीकरण मोहिमेत अनागोंदी कारभाराबाबत सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल. ज्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तक्रारी आहेत त्यांची नियमानुसार चौकशी करून कारवाई केली जाईल आणि विशेष म्हणजे कर्मचारी व डॉक्टर मुख्यालयातच थांबतील असे लेखी आश्वासन उपोषणकर्ते मिथुन निकम तसेच भाजप पदाधिकारी व ग्रामस्थांना दिले. त्यामुळे मिथुन निकम यांनी तात्पुरत्या स्वरूपात उपोषण स्थगित केले. येत्या 7 दिवसात जर कार्यवाही झाली नाही तर पुन्हा उपोषण सुरू करू, त्यावेळी मात्र कोणाचेही ऐकणार नाही, असा इशारा दिला आहे.

