( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
गुहागर तालुक्यातील मराठी शाळेत दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या चिमुरडीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी शिक्षक उदय नामदेव वेल्हाळ याला चिपळूण येथील विशेष न्यायालयाने आजन्म कारावास (जन्मठेप) आणि १० लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश हि. पी. म्हालटकर यांनी दिलेल्या या महत्त्वपूर्ण निकालातून बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्याची न्यायालयाने गांभीर्याने दखल घेतल्याचे अधोरेखित झाले आहे. या खटल्यात विशेष ज्येष्ठ सरकारी अभियोक्ता पुष्पराज शशिकांत शेट्ये यांनी पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षींच्या आधारे सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडत केलेला कायदेशीर युक्तिवाद विशेष उल्लेखनीय ठरला आहे.
शिक्षकाला समाजात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारा आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारा गुरू म्हणून मानाचे स्थान दिले जाते. मात्र याच पवित्र पेशाला काळिमा फासणाऱ्या गुहागर तालुक्यातील एका शिक्षकाच्या कृत्याने गुरु-शिष्य नात्यावरील विश्वासालाच तडा गेला. दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या निरागस चिमुरडीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी शिक्षक उदय नामदेव वेल्हाळ याला चिपळूण विशेष न्यायालयाने आजन्म कारावास आणि १० लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. ज्या वयात विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी आदर, विश्वास आणि सुरक्षिततेची भावना रुजायला हवी, त्याच वयातील चिमुरडीच्या विश्वासाचा गैरफायदा घेणारे असे कृत्य केवळ शिक्षकी पेशालाच नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या नैतिकतेला काळिमा फासणारे आहे. या प्रकरणातील घटना मार्च २०२० मधील आहे. गुहागर तालुक्यातील एका मराठी शाळेत पीडित बालिका दुसरीच्या वर्गात शिकत होती. त्या वर्गाला शिकवण्याची जबाबदारी आरोपी शिक्षक उदय वेल्हाळ याच्याकडे होती. ७ मार्च २०२० रोजी बालिका घरी परतल्यानंतर ती लंगडत चालत असल्याचे तिच्या आईच्या निदर्शनास आले. आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, आरोपी शिक्षकाने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पीडितेच्या आईने गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासाअंती आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानातील कलम ३७६ (क) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमातील (पोक्सो) संबंधित कलमांनुसार दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
या खटल्याच्या सुनावणीपूर्वीच पीडित बालिकेच्या आईचे निधन झाले. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयीन लढा लढताना सरकार पक्षासमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, विशेष ज्येष्ठ सरकारी अभियोक्ता पुष्पराज शेट्ये यांनी गुहागर पोलिसांच्या सहकार्याने सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. न्यायालयीन प्रक्रियेत एकूण दहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे सरकारी पक्षाने आपली बाजू न्यायालयासमोर मांडली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी शिक्षकाला दोषी ठरवत आजन्म कारावास (जन्मठेप) आणि १० लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
बालकावरील लैंगिक अत्याचारासारख्या संवेदनशील आणि गंभीर प्रकरणात सरकारी अभियोक्त्याची भूमिका केवळ खटला चालविण्यापुरती मर्यादित नसते. तर उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि कायदेशीर तरतुदी यांच्या आधारे पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयासमोर वस्तुस्थिती प्रभावीपणे मांडणे महत्त्वाचे असते. या खटल्यात विशेष ज्येष्ठ सरकारी अभियोक्ता पुष्पराज शेट्ये यांनी केलेला युक्तिवाद, प्रकरणाचा पाठपुरावा आणि सरकार पक्षाची बाजू ठामपणे मांडण्याची भूमिका विशेष उल्लेखनीय ठरली आहे. पीडितेच्या आईचे निधन झालेले असतानाही खटल्याची सुनावणी पुढे नेऊन न्यायालयीन प्रक्रियेत सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे सादर करण्यात आली.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पाटील यांनी केला. न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल पी. भंडारी आणि ए. एस. शिंदे यांनी काम पाहिले. या निकालामुळे पीडित बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी तपास यंत्रणा आणि सरकारी अभियोक्ता यांच्यातील समन्वयाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. या निकालाबद्दल आता समाजातील विविध स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे.
पुष्पराज शेट्ये यांच्या कामकाजाची चर्चा
न्यायालयीन खटल्यात प्रभावी युक्तिवाद, पुराव्यांचे नेमके विश्लेषण आणि कायद्याचा सखोल अभ्यास या बाबी निकालाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात. विशेष ज्येष्ठ सरकारी अभियोक्ता पुष्पराज शेट्ये यांच्या कामकाजाची चर्चा याच संदर्भातून होत आहे. विविध गुन्ह्यांच्या खटल्यांत गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी प्रभावीपणे सरकारी पक्षाची बाजू मांडल्याचे पाहायला मिळाले आहे. गंभीर आणि संवेदनशील प्रकरणांमध्ये सरकारी अभियोक्त्याची जबाबदारी अधिक कसोटीची असते. पीडितांच्या वेदनांची जाणीव ठेवून, उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे न्यायालयासमोर वस्तुस्थिती ठोसपणे मांडणे आवश्यक असते. अशा वेळी कायदेशीर तरतुदींचे ज्ञान, युक्तिवादातील अचूकता आणि खटल्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरतो. न्यायालयीन लढ्यातील चिकाटी, कायद्याचा अभ्यास आणि जबाबदारीची जाणीव यांमुळे ज्येष्ठ सरकारी अभियोक्ता पुष्पराज शेट्ये यांच्या कामगिरीची दखल घेतली जात आहे. पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत सरकारी अभियोक्त्याचे योगदान किती मोलाचे असते, याची जाणीव या प्रकरणाच्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.


