(गणपतीपुळे / वैभव पवार)
भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२५ उपक्रमाअंतर्गत, रत्नागिरी तालुक्यातील निवडक पाच ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या सत्कोंडी ग्रुप ग्रामपंचायतीची तपासणी केंद्रस्तरीय पथकाकडून १३ जुलै २०२५ रोजी करण्यात आली.
२०१४ मध्ये सुरू झालेल्या स्वच्छ भारत मिशनचा २.१ टप्पा (२०२०-२०२५) सध्या अंतिम टप्प्यात असून, देशभरातील निवडक गावांमध्ये स्वच्छतेबाबतची अंमलबजावणी तपासण्यासाठी केंद्रस्तरीय निरीक्षण सुरू आहे.
पथकाने केली विविध सुविधा व उपक्रमांची पाहणी
पथकाने गावातील शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छतागृहे, तसेच दिव्यांग व्यक्तींच्या घरांना भेट देऊन उपलब्ध सोयी-सुविधा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अंमलबजावणीची पाहणी केली. याशिवाय, शोषखड्डे, कचरा विलगीकरण शेड, हँडवॉश स्टेशन, परसबाग निर्मिती, गांडूळखत प्रकल्प, गटारे व रस्ते सफाई यांचीही पाहणी करण्यात आली.
निरीक्षणाच्या दरम्यान शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांचे अनुभव, अडचणी व उपक्रमांबाबतची माहिती जाणून घेतली.
निरीक्षण पथकात मान्यवरांची उपस्थिती
या तपासणी पथकाचे नेतृत्व केंद्र सरकारकडून नियुक्त संस्थेचे अमोल राजपूत यांनी केले. त्यांना साथ दिली जिल्हा परिषदेचे पाणी गुणवत्ता तालुका समन्वयक अधिकारी सविनय जाधव आणि कृषि विस्तार अधिकारी अक्षय शिंदे यांनी. तपासणीत नांदीवडे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संदीप जाधव आणि सैतवडे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ओमकार शिर्के यांनी विशेष सहकार्य केले.
या कार्यक्रमात सत्कोंडी ग्रामपंचायतीचे सरपंच सतिश थुळ, उपसरपंच चंद्रकांत मालप, ग्रामसेवक श्रीकांत कुळ्ये, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण मोर्ये, सदस्य अजय काताळे, प्रणाली मालप, समिक्षा घाटे, ममता बंडबे, निकिता शिगवण यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षण व आरोग्य क्षेत्रातून मुख्याध्यापक सुभाष पालये, सुशिल वासावे, अंगणवाडी सेविका चित्रा बैकर, कमल मालप, आशा वर्कर्स नेहा पवार व सुजाता खापले, तसेच आरोग्य विभागाच्या समुदाय आरोग्य अधिकारी धनश्री पावरी, आरोग्य सेवक अमोल भोके, सेविका पूनम लाड, पोलीस पाटील श्रीकांत खापले, व इतर स्थानिक अधिकारीही उपस्थित होते.
ग्रामपंचायतीने या तपासणीसाठी संपूर्ण तयारी ठेवली होती. सर्व संबंधित यंत्रणा, अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रितपणे सहभाग नोंदवून “स्वच्छ भारत” मोहिमेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याची बांधिलकी दर्शवली.