(जाकादेवी / वार्ताहर)
साहित्य, पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) वतीने दिला जाणारा २०२४-२०२५ चा प्रतिष्ठेचा श्री. बा. कारखानीस पुरस्कार मालगुंड शिक्षण संस्थेचे उपक्रमशील चेअरमन आणि मालगुंड गावचे माजी सरपंच सुनील ऊर्फ बंधू मयेकर यांना जाहीर झाला आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विकासात्मक कार्याची दखल घेण्यात आली आहे.
सुनील ऊर्फ बंधू मयेकर हे १९८३ पासून मालगुंड शिक्षण संस्थेत पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते संस्थेचे चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. संस्थेच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, सुसज्ज इमारती व अद्ययावत वर्गरचना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग, आपत्कालीन आर्थिक मदत निधी योजना, वृक्षसंवर्धन उपक्रम, विद्यार्थी-शिक्षक-पालक सुसंवाद आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित रोबोटिक्स क्लास अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सक्रिय आहेत.
मालगुंड गावचे सरपंच म्हणून कार्यरत असताना त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. गोरगरीब नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासह गावात विविध विकासकामे राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. कामांचे योग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी यांमुळे मयेकर यांनी जनमानसात आदराचे स्थान निर्माण केले. पदाला योग्य न्याय देण्याचे तत्त्व त्यांनी आपल्या कार्यातून जपले.
मयेकर यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते मालगुंड गावाला निर्मल ग्राम पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. सुनील मुरारी मयेकर यांच्या नेतृत्वाखाली गावाने मिळविलेला हा सन्मान त्यांच्या विकासाभिमुख कार्याची महत्त्वपूर्ण नोंद ठरला.
विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये लोकप्रिय असलेल्या बंधू मयेकर यांचा लौकिक संपूर्ण तालुक्यात आहे. त्यांचे वडील, समाजसेवक कै. भाई मयेकर यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा वारसा ते पुढे चालवत आहेत. शैक्षणिक प्रगतीबरोबरच सामाजिक सेवेतही त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि आशावादी दृष्टिकोनातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर आणि केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी या पुरस्कारासाठी सुनील मयेकर यांच्या नावाची घोषणा केली. या पुरस्काराचे वितरण २८ व २९ नोव्हेंबर रोजी मालगुंड येथे होणाऱ्या केंद्रीय साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे.
सुनील ऊर्फ बंधू मयेकर यांना प्रतिष्ठेचा श्री. बा. कारखानीस पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तालुक्यातून आणि जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


