(राजापूर / तुषार पाचलकर)
रायपाटण गावातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे भास्कर तुकाराम गांगण (वय ७०) यांचे शुक्रवारी ( २३ रोजी) मुंबईतील नानावटी रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ‘भाई’ या नावाने पंचक्रोशीत परिचित असलेल्या गांगण यांच्या निधनाने रायपाटणसह पूर्व परिसरात शोककळा पसरली आहे.
रायपाटण गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भास्कर गांगण यांनी सातत्याने योगदान दिले. सामाजिक आणि विकासात्मक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. दांडगा जनसंपर्क आणि सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध यांमुळे समाजातील विविध स्तरांतील लोकांमध्ये ते लोकप्रिय होते. गावाच्या प्रगतीसाठी कोणत्याही कामात पुढाकार घेण्याची त्यांची वृत्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विशेष ओळख होती.
रायपाटण गावची ग्रामदेवता श्री वडची आई देवीच्या भव्य मंदिराच्या उभारणीत भास्कर भाईंचे योगदान विशेष महत्त्वाचे ठरले. मंदिर बांधकामासाठी निधी संकलनाची अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी तन, मन आणि धन अर्पण करून या कामासाठी प्रयत्न केले. त्यांच्या देखरेखीखाली मंदिर उभारणीचे भव्य काम पूर्ण झाले. गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या जतनासाठी त्यांनी दिलेले योगदान ग्रामस्थांच्या कायम स्मरणात राहील.
गांगणवाडी येथील उत्कर्ष दीप युवा मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. या मंडळाच्या माध्यमातून रायपाटण आणि गांगणवाडी परिसरातील विविध सुधारणांसाठी त्यांनी पुढाकार घेतला. गावातील महत्त्वाच्या कामांमध्ये त्यांचे मार्गदर्शन आणि सहभाग लाभत असे. सामाजिक बांधिलकी जपत गावाच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.
भास्कर गांगण यांच्या पार्थिवावर मुंबईतील पार्ले परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, सामाजिक क्षेत्रातील सहकारी आणि हितचिंतकांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे आणि परिवार असा परिवार आहे. भास्कर भाईंच्या आकस्मिक निधनाने रायपाटण गावाने सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले आणि गावाच्या विकासासाठी योगदान देणारे नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.


