(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातून वाहणाऱ्या प्रसिद्ध अर्जुना नदीतील पाचल पेठवाडी येथील जांगलदेव परिसरातील गणेश विसर्जन घाटाजवळ साचलेला गाळ काढण्याच्या कामाला सध्या वेग आला आहे. राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात आले असून गेल्या तीन दिवसांपासून गाळ उपसा सुरू आहे.
अर्जुना नदी परिसरात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे नदीपात्र उथळ होत होते. विशेषतः गणेश विसर्जन घाट परिसरात नागरिकांना विसर्जनावेळी अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच पावसाळ्यात नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह मंदावण्याची शक्यता निर्माण होत होती. ही बाब लक्षात घेऊन स्थानिकांच्या मागणीनुसार गाळ उपसा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्या सुरू असलेल्या या कामामुळे नदीपात्र अधिक स्वच्छ व मोकळे होण्यास मदत होणार असून भविष्यात पूरस्थितीचा धोका कमी होण्यासही हातभार लागणार आहे. संबंधित यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजून काही दिवस हे काम सुरू राहणार आहे.
या कामाची पाहणी तळवडे-पाचल विभागप्रमुख अमर जाधव, पाचल विभाग मुंबई संपर्क प्रमुख विहंग खानविलकर तसेच हर्षद तेलंग यांनी केली. यावेळी त्यांनी कामाची माहिती घेत संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार किरण उर्फ भैया सामंत यांचे आभार मानले आहेत.

