(राजापूर / रत्नागिरी)
राजापूर शहरातील खडपेवाडी येथे एका घरात सुरू असलेल्या तीन पत्तीच्या जुगार अड्ड्यावर राजापूर पोलिसांनी कारवाई केली. पैशांची पैज लावून जुगार खेळला जात असल्याच्या संशयावरून करण्यात आलेल्या या कारवाईत सहा जण पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडून अंगझडतीतील एकूण ५ हजार ७९५ रुपयांची रोकड, ५२ पानी पत्त्यांचे तीन कॅट, दोन पेन आणि आकडेमोड लिहिलेली एक कागदी चिठ्ठी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई ३ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ९.५५ वाजण्याच्या सुमारास राजापूर शहरातील खडपेवाडी येथे करण्यात आली. विलास केरू पवार यांच्या घरात शासनाची परवानगी नसताना जुगारासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचा तसेच पैशांच्या साहाय्याने तीन पत्तीचा जुगार खेळवून त्यावर पैजा लावल्या जात असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. कारवाईदरम्यान समीर रविकांत शिंदे (४२), वीरेंद्र विठ्ठलराव देसाई (४३), गजाननप्रसाद विठ्ठल कोळवणकर (३९), दीपक महादेव पवार (३८), मंगेश शंकर तुयले (५०) आणि विलास केरू पवार (७६) या सहा जणांवर कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी केलेल्या अंगझडतीत समीर शिंदे यांच्याकडून ५३० रुपये, वीरेंद्र देसाई यांच्याकडून ६१० रुपये, गजाननप्रसाद कोळवणकर यांच्याकडून १ हजार ७०० रुपये, दीपक पवार यांच्याकडून १ हजार ३९० रुपये, मंगेश तुयले यांच्याकडून १ हजार ३६० रुपये आणि विलास पवार यांच्याकडून २०५ रुपये अशी रोकड मिळून आली. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई संग्राम कृष्णात नरुटे (३२) यांनी फिर्याद दिली आहे. संबंधितांविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ मधील कलम ४(१)(अ), ४(१)(य) आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर शहर आणि परिसरात जुगाराच्या प्रकारांवर पोलिसांकडून कारवाई सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करीत आहेत.


