(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल कोंडवाडी येथील कु. आकांक्षा प्रमोद तेलंग हिने स्वतःच्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर महाराष्ट्र पोलिस दलात स्थान मिळवले आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आकांक्षा ही सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय, पाचल येथील माजी विद्यार्थिनी आहे. साध्या कुटुंबातून पुढे येत तिने मोठे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. कठोर परिश्रम, नियमित अभ्यास आणि शारीरिक तयारीच्या जोरावर तिने पोलिस भरती प्रक्रियेत यश संपादन केले.
आकांक्षा ही सध्या मुंबईतील वर्तक नगर, ठाणे येथे वास्तव्यास असून, तिच्या यशामुळे परिसरातील युवक-युवतींसाठी ती प्रेरणास्थान ठरत आहे. ग्रामीण भागातील मुलींनीही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करू शकतात, याचे उत्तम उदाहरण आकांक्षाने घालून दिले आहे.
तिच्या या यशाबद्दल गावातील ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शाळेचे शिक्षक यांनी आनंद व्यक्त करत तिचे विशेष कौतुक केले आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

