(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर स्मशानभूमीलगत उभारण्यात आलेली धूपप्रतिबंधक संरक्षण भिंत गेल्या काही दिवसांपूर्वी कोसळली आहे. समुद्राच्या जोरदार लाटांचा या भिंतीला मोठ्या प्रमाणात तडाखा बसल्याने ती कोसळल्याची माहिती स्थानिक रहिवासी आणि किनाऱ्यावरील व्यावसायिकांनी दिली. भिंत कोसळल्यामुळे आता स्मशानभूमीतील शेडलाही धोका निर्माण झाला असून, या ठिकाणी नव्याने संरक्षण भिंत उभारण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले होते. आरसीसी प्रकारची ही भिंत अनेक वर्षे सुस्थितीत होती. मात्र, यंदा समुद्राच्या मोठमोठ्या लाटांचा जोरदार मारा झाल्याने अखेर ही भिंत कोसळली.
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर गावाची स्मशानभूमी असून, तेथील स्मशान शेडला समुद्राच्या लाटांमुळे धोका निर्माण होऊ नये आणि किनाऱ्याची धूप रोखता यावी, या उद्देशाने ही संरक्षण भिंत बांधण्यात आली होती. मात्र, भिंत कोसळल्याने स्मशानभूमीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, स्मशानभूमीलगत गणपतीपुळे पर्यटन विकास आराखड्यांतर्गत घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित काम सुरू आहे. कोसळलेल्या संरक्षण भिंतीचे दगड या कामाच्या ठिकाणापर्यंत अस्ताव्यस्त पसरले आहेत. हे दगड जेसीबीच्या साहाय्याने उचलण्याचे काम संबंधित ठेकेदाराकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे.
संरक्षण भिंत कोसळल्याने या परिसरात नव्याने भिंत उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे गणपतीपुळे ग्रामपंचायत आणि बंदर खात्याने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.


