(खेड /रत्नागिरी)
घराजवळील मैदानात खेळण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन तेजस उपेंद्र घोडे याच्यावर पाठीमागून लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना खेडमधील कोष्टी आळी येथे घडली. या हल्ल्यात तेजसच्या डोक्याला दुखापत झाली असून, हल्ल्यानंतर घटनास्थळावरून एका अनोळखी बुरखाधारी महिलेने पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. २० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजस उपेंद्र घोडे हा आपल्या राहत्या घराजवळील मैदानात खेळण्यासाठी जात होता. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तेजस जखमी होऊन मैदानात कोसळला. दरम्यान, तेजसचा मोठा भाऊ ओम हा मैदानाच्या दिशेने जात असताना त्याला तेजस जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्याने आरडाओरडा केल्यानंतर जवळच असलेली बुरखाधारी अनोळखी महिला घटनास्थळावरून पळून गेली. या महिलेचे नाव आणि गाव समजू शकलेले नाही. हल्ला नेमका कोणी केला आणि त्यामागील कारण काय, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.
या प्रकरणी तेजसचे वडील उपेंद्र भिकाजी घोडे (वय ५३, सध्या रा. कोष्टी आळी, खेड, मूळ रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पोलीस ठाण्याशेजारी, खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यासह घटनेमागील कारणाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.


