( रत्नागिरी /प्रतिनिधी )
रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायत हद्दीतील पत्रकार कॉलनीच्या शेजारी ‘बार’ सुरू करण्याच्या हालचालींविरोधात परिसरातील नागरिकांचा संताप उसळला आहे. या प्रस्तावित बारविरोधात नागरिकांनी एकत्र येत एकजुट दाखवत सही मोहीम राबवली असून, थेट पालकमंत्री तथा उद्योगमंत्री मा. उदय सामंत आणि आमदार श्री. किरण सामंत यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे.
श्री. विकास सदाशिव चव्हाण यांनी त्यांच्या भाउबीज बंगला (३/२१४, पत्रकार कॉलनी शेजारी, कुवारबाव) या खासगी निवासस्थानी बार सुरू करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे परवाना मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. संबंधित जागेची पाहणी पोलीस प्रशासनाकडूनही करण्यात आली आहे, अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे. मात्र, या परिसरात पत्रकार कॉलनी, भूविकास कॉलनीसारख्या निवासी वस्त्या असून शेजारीच जिल्हा परिषद शाळा आणि माने इंटरनॅशनल स्कूलही कार्यरत आहे. दररोज या रस्त्यावरून महिला, मुले, वृद्ध नागरिक मोठ्या संख्येने ये-जा करतात. अशा ठिकाणी मद्यविक्रीचा बार सुरू झाल्यास सामाजिक वातावरण बिघडण्याचा मोठा धोका असून महिलांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
विशेष म्हणजे, ग्रामपंचायत कुवारबावकडे चव्हाण यांनी बारसाठी स्थानिक परवानगी मागितली होती. मात्र ग्रामपंचायतीने ती स्पष्टपणे फेटाळली असूनही त्यांनी परवाना मिळवण्यासाठी वरच्या स्तरावर पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आणि संताप निर्माण झाला आहे. नागरिकांच्या वतीने पालकमंत्र्यांकडे सादर केलेल्या निवेदनात स्पष्ट मागणी करण्यात आली आहे की, सदर बारला कोणतीही परवानगी देऊ नये. परिसरातील सामाजिक समतोल अबाधित ठेवण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी.
तसेच या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, रत्नागिरी, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी, उत्पादन शुल्क निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, प्रशासक/ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कुवारबाव संबंधित अधिकाऱ्यांकडेही देण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणावर तातडीने कारवाई करत, नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि सामाजिक आरोग्याला प्राधान्य द्यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.