(वैभव पवार / गणपतीपुळे)
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि वाढत्या प्रसारमाध्यमांच्या काळात विद्यार्थ्यांवर संस्कार होणे काळाची गरज आहे. यासाठी त्यांना आपल्या महामानवाच्या जीवनाची, त्यांच्या कार्याची व संघर्षाची माहिती असणे गरजेचे आहे. त्यातूनच त्यांचा व्यक्तिमत्व विकास होऊ शकतो. म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने आणि जाणीवपूर्वक वाचन करणे आवश्यक असल्याचे मत सागरी पोलीस ठाणे जयगडचे पोलीस उपनिरीक्षक विलास दिडपिसे यांनी व्यक्त केले.
ते रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेच्या वतीने महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने सलग १२ वाचन उपक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, लहान वयात विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाल्यास असे विद्यार्थी भविष्यात यशस्वी वाटचाल करत असतात. त्यासाठी शाळेने राबविलेला हा उपक्रम उपयुक्त ठरतो.
यावेळी उपस्थित असणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष निंबाळकर यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती सांगताना विद्यार्थी सलग १२ तास वाचनास बसले आहेत, ही बाब नक्कीच समाधानकारक असून, सातत्याने असे उपक्रम राबविण्यात यावेत. तसेच अशा उपक्रमाची व्याप्ती वाढवून परिसरातील शाळांनीही या उपक्रमात सहभागी होण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमात युयुत्सु आर्ते यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना वाचताना काय वाचले पाहिजे आणि त्यासाठी ते वाचन आत्मसात व्हावे यासाठी काय करता येईल याबाबत माहिती दिली. या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी आवर्जून उपस्थित असणारे बसणी हायस्कूलचे मुख्याध्यापक पांडुरंग नाईक यांनीही या उपक्रमात मी काय वाचलेले आहे हे सांगण्यासाठी विद्यार्थ्यांची उत्सुकता या उपक्रमाची यशस्वीता दिसून येते आणि आपण वाचलेले ते न अडखळता सांगतात यातूनच उपक्रमाचे महत्व समजून येत असल्याची माहिती दिली.
समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पा धनवाडे यांनीही शाळा आणि शिक्षकांच्या माध्यमातून राबवत असलेल्या अशा वैविध्यपूर्ण उपक्रमाला पालक आणि ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते, याचा मला अभिमान असून, सर्वांच्या सहकार्यातूनच असे उपक्रम यशस्वी होत असल्याची भावना व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
तसेच या स्तुत्य उपक्रमाला दूरध्वनीवरून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर, महाराष्ट्र राज्याच्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्षा ज्योती ठाकरे, शिक्षणाधिकारी किरण लोहार, माजी शिक्षणाधिकारी बी. एम. कासार, माजी गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
या दिवसभराच्या उपक्रमात जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आगरनरळ शाळेचे मुख्याध्यापक सुरेश सुर्वे, जिंदाल विद्या मंदिर शाळेच्या अनिता नाईक, वाटद रायवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका महामाया सुर्वे, आरोग्य विभागाच्या रंजना कदम, वाटद क्रमांक एक शाळेचे शिक्षक मनोहर इनामे यांनी प्रत्यक्ष भेट देत, विद्यार्थ्यांसोबत सहभाग घेतला. यावेळी सर्वांनीच विद्यार्थ्यांच्या संयम, सहनशीलता व चिकाटीचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमाची सुरुवात सकाळी ६ वाजता झाली. उपक्रमाच्या सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून, वाचन करण्याची शपथ घेतली. त्यानंतर वाचनास सुरुवात झाली. यावेळी उपस्थित शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निकिता नितीन कुर्टे आणि शिक्षणतज्ज्ञ विलास बारगुडे यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या अभिनव उपक्रमाचे नियोजन पंचायत समिती रत्नागिरचे गटशिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय सोपनूर, गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, केंद्रप्रमुख संतोष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे आणि सहकारी शिक्षिका राधा नारायणकर यांनी केले. या समारोप प्रसंगी निखिल चव्हाण, नितीन वाडेकर, पंकज मोहिते, भाऊ धनावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा विकास समितीचे अध्यक्ष अप्पा धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निकिता कुर्टे, उपाध्यक्ष सागर घवाळी, सदस्य उदय रहाटे, बालरक्षक विश्वनाथ शिर्के, मारुती कुर्टे, रमेश तांबटकर, नुतन रहाटे, अक्षरा शिर्के, अनिल रेवाळे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती, शाळा विकास समिती, सर्व पालक आणि ग्रामस्थ यांनी विशेष प्रयत्न केले.
या उपक्रमात शाळेचे आजी – माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली व इतर पुस्तकांचे वाचन करत अभिवादन केले. मागील अनेक वर्षे शाळेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना, सलग वाचन करत वैचारिक अभिवादन व्हावे, यासाठी या उपक्रमाचे सातत्याने आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना लहान वयातच वाचनाची गोडी निर्माण व्हावी या हेतूने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
या उपक्रमाच्या उपक्रमाच्या सुरुवातीला आणि समारोपप्रसंगी पालक व ग्रामस्थ यांची उपस्थिती मोठी होती.

