(खेड/ रत्नागिरी)
मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, कशेडी ओझरवाडी परिसरात भरधाव बोलेरो पिकअपने रस्त्याने पायी जाणाऱ्या एका अनोळखी पुरुषाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात डोक्यासह पोटाला आणि दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याने अंदाजे ५५ ते ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात २० नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातातील मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी ओझरवाडी येथे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर संबंधित व्यक्ती पायी चालत जात होती. यावेळी बोलेरो पिकअप (क्र. एमएच ०८ बीके ०९५४) वरील चालक नितीन सदाशिव कदम (वय ३७, रा. खडपोली कदमवाडी, ता. खेड) याने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन निष्काळजीपणे चालविले. त्यात पिकअपने पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या धडकेत संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली. डोके, पोट आणि दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कशेडीच्या पोलीस पाटील स्वरा समीर गावणकर यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चालक नितीन कदम याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.४८ वाजता या अपघाताची नोंद करण्यात आली. दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव, गाव आणि नातेवाईकांची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. त्यामुळे मृताची ओळख पटविण्याचे आव्हान आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.


