(संगमेश्वर / प्रतिनिधी)
पाठीच्या कण्यातील गुंतागुंतीच्या ट्युमरमुळे दोन्ही पायांची हालचाल गमावून व्हीलचेअरवर आलेल्या महाड येथील ४२ वर्षीय रुग्णाने उच्च जोखमीच्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा चालण्यास सुरुवात केली आहे. वालावलकर रुग्णालयात करण्यात आलेल्या या अवघड शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तीन ते चार दिवसांतच रुग्ण वॉकरच्या साहाय्याने उभा राहून चालू लागल्याने वैद्यकीय क्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून या रुग्णाच्या दोन्ही पायांमध्ये हळूहळू अशक्तपणा वाढत होता. आजाराची तीव्रता वाढल्याने त्याची चालण्याची क्षमता पूर्णपणे संपुष्टात आली होती. परिणामी, त्याला व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागत होता. दैनंदिन कामांसाठीही तो इतरांवर अवलंबून होता. सखोल वैद्यकीय तपासणीनंतर पाठीच्या कण्याच्या D8-D9 या पातळीवर गुंतागुंतीचा ट्युमर असल्याचे निदान झाले. या ट्युमरमुळे स्पायनल कॉर्डवर गंभीर दाब निर्माण झाला होता.
मेंदू व मणका शल्यचिकित्सक डॉ. मृदुल भाटजीवाले आणि त्यांच्या पथकाने चार तासांपेक्षा अधिक काळ चाललेली ही जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. या प्रक्रियेत डॉ. ऋषिकेश आणि डॉ. निवेदिता यांच्यासह तज्ज्ञ भूलतज्ज्ञ पथकाचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. शस्त्रक्रिया अधिक सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी अत्याधुनिक इंट्राऑपरेटिव्ह न्यूरोमॉनिटरिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
शस्त्रक्रियेनंतर लगेचच रुग्णाच्या पायांमध्ये हालचाल सुरू झाल्याचे दिसून आले. त्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसांत पायांमध्ये पुरेशी ताकद निर्माण झाल्याने रुग्णाने वॉकरच्या साहाय्याने उभे राहून चालण्यास सुरुवात केली. रुग्णाच्या प्रकृतीत झालेल्या या सकारात्मक बदलामुळे त्याच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत ही संपूर्ण शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. या यशस्वी उपचारामुळे कोकणातील मेंदू, मज्जासंस्था आणि मणक्याच्या गुंतागुंतीच्या विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी वालावलकर रुग्णालय आशेचा नवा किरण ठरले आहे. कोकणातही तज्ज्ञ शल्यचिकित्सकांसह अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध असल्याचे या शस्त्रक्रियेतून अधोरेखित झाले आहे.
याबाबत १० वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेले डॉ. भाटजीवाले म्हणाले, “आधीच कमकुवत झालेल्या स्पायनल कॉर्डसह पाठीच्या कण्याच्या पृष्ठीय भागातील ट्युमर काढणे ही अत्यंत जोखमीची आणि नाजूक प्रक्रिया आहे. नाजूक चेतासंस्थेला इजा न होता ट्युमर सुरक्षितपणे काढण्यासाठी अत्यंत काळजी आणि शल्यचिकित्सा कौशल्याची आवश्यकता असते. अशा दुर्मिळ आणि जलद बरे होण्याच्या प्रक्रियेत देवाचा हात दिसून येतो.”


