(पाली / वार्ताहर)
रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर खानू गावाजवळ मंगळवारी (१६ जून) रात्री ट्रेलर आणि ओमनी कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघेजण गंभीर जखमी झाले. या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही काळ महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला.
पाली पोलीस दूरक्षेत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास पटेल सॉमिलसमोरील रस्त्यावर ट्रेलर (क्र. RJ-27-GD-3587) चालक कांतीलाल सासिया मीणा (रा. साबळा, जि. डुंगरपूर, राजस्थान; सध्या देवळेफाटा, ता. संगमेश्वर) हा वाहन मागे घेत होता. यावेळी रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता तसेच कोणताही इशारा किंवा सिग्नल न देता निष्काळजीपणे ट्रेलर मागे घेतल्याने रत्नागिरीहून करंजारीकडे जाणाऱ्या ओमनी कारला (क्र. MH-07-H-0021) जोरदार धडक बसली.
या अपघातात कारमधील शोएब अख्तर मजिमुल्ला खान (वय २४), मजिमुल्ला खान, जिक्रुनिसा मजिमुल्ला खान (वय ४५) आणि सानिया मजिमुल्ला खान (वय १६, सर्व रा. करंजारी, ता. संगमेश्वर) हे गंभीर जखमी झाले. धडकेनंतर जखमी वाहनात अडकून पडले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत त्यांना वाहनाबाहेर काढले आणि पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले.
या प्रकरणी जखमी शोएब अख्तर मजिमुल्ला खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाली पोलीस दूरक्षेत्रात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास महिला हेड कॉन्स्टेबल तृप्ती सावंत-देसाई करीत आहेत.

