(जैतापूर / राजन लाड)
कोकणच्या मातीतून आलेल्या हर्षिका संतोष मेळेकर हिने ‘गमन’ या मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे. राजापूर तालुक्यातील जैतापूर हे मूळ गाव असलेल्या आणि सध्या मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथे वास्तव्यास असलेल्या हर्षिकाने या चित्रपटात साकारलेल्या ‘तारा’ या मध्यवर्ती भूमिकेतून आपली अभिनयक्षमता दाखवून दिली आहे. रंगभूमीवरील अनुभव, शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण आणि घरातून मिळालेल्या कलात्मक संस्कारांच्या बळावर तिने सिनेसृष्टीत पहिले पाऊल टाकले आहे.
हर्षिकाचे शालेय तसेच उच्च शिक्षण मुंबईत झाले. विलेपार्ले येथील नामांकित डहाणूकर महाविद्यालयातून तिने ‘मास मीडिया आणि कम्युनिकेशन्स’ (BAMMC) ही पदवी प्राप्त केली. तिचे आई-वडील शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना अध्यापन करतात, तर तिची मोठी बहीण अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. घरातच कलेचे वातावरण असल्याने हर्षिकाला लहानपणापासून नृत्य आणि अभिनयाची आवड निर्माण झाली. आई-वडिलांच्या कलाप्रेमातून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे तिने या क्षेत्रात वाटचाल सुरू केली.

हर्षिकाने भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार असलेल्या भरतनाट्यमचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले असून, या नृत्यप्रकारातील प्रतिष्ठेचा टप्पा मानला जाणारा ‘अरंगेत्रम’ तिने यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिने एकांकिका, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आणि विविध पथनाट्यांमधून अभिनयाची चुणूक दाखवली. याशिवाय, आपल्या मोठ्या बहिणीसोबत ती एका डिजिटल जाहिरातीतही झळकली होती.
या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक मनोज नाईकसाटम यांनी ‘गमन’ चित्रपटासाठी हर्षिकाची निवड केली. चित्रपटातील एका भूमिकेसाठी १४ ते १५ वर्षे वयोगटातील निरागस चेहऱ्याची आवश्यकता होती. त्यावेळी दिग्दर्शकांच्या नजरेस हर्षिकाचे छायाचित्र पडले. त्यानंतर झालेल्या ऑडिशनमध्ये तिने आपल्या अभिनयकौशल्याची छाप पाडली आणि ‘तारा’ या प्रमुख भूमिकेसाठी तिची निवड झाली.
मानसी नाईकसाटम निर्मित आणि नाईक साटम आर्ट्सच्या बॅनरखाली साकारलेला ‘गमन’ हा चित्रपट केवळ कोकणातून रोजगारासाठी होणाऱ्या स्थलांतराची कथा मांडत नाही, तर महानगरांमध्ये विस्थापित झालेल्या माणसांचे भावविश्व आणि आपल्या मूळ गावाशी असलेले नातेही संवेदनशीलतेने उलगडतो. या चित्रपटात हर्षिकाने बिहारमधील पूरग्रस्त भागातून उपजीविकेसाठी मुंबईत आलेल्या ‘तारा’ या मुलीची भूमिका साकारली आहे. आव्हानात्मक आणि भावस्पर्शी असलेली ही व्यक्तिरेखा तिने प्रभावीपणे पडद्यावर उभी केली आहे.
२ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात हर्षिकासोबत नारायण जाधव, श्रद्धा खानोलकर, सचिन वळूंज, दीपक कुमार आणि नीलेश पवार यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
जैतापूरच्या मातीतून मुंबईच्या रुपेरी पडद्यापर्यंत पोहोचलेल्या हर्षिका मेळेकर हिच्या या यशामुळे तिच्या मूळ गावी तसेच संपूर्ण राजापूर तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. तिच्या अभिनयप्रवासाचे आणि ‘गमन’मधील भूमिकेचे सिनेसृष्टीतूनही कौतुक होत आहे. कोकणाशी आपली नाळ जपणाऱ्या हर्षिकाच्या या पदार्पणामुळे जैतापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
फोटो : हर्षिकाची आजी लक्ष्मीबाई मेळेकर, वडील संतोष, आई समृद्धी मोठी बहीण समीक्षा आणि छोटा भाऊ श्रीयश छायाचित्रात दिसत आहेत.


