(गुहागर /रत्नागिरी)
सामाईक जमिनीचे व्यवहार स्वतःच्या नावे करून देण्यासाठी वारंवार तगादा लावणे, तसेच जमिनीच्या व्यवहारावरून दबाव आणि धमकी दिल्यामुळे ६७ वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यशवंत महादेव कुळे (वय ६७, रा. गोणवली, कुळेवाडी, ता. गुहागर) यांच्या आत्महत्येप्रकरणी चार जणांविरोधात गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १०८, ३५१(२) आणि ३(५) अन्वये हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दाखल तक्रारीनुसार, यशवंत कुळे यांची मौजे गोणवली येथील गट क्रमांक ३४३, २८१, २८९ आणि २४३ मधील सामाईक जमीन होती. या जमिनीच्या व्यवहारासंदर्भात पराग कोळवणकर, संतोष जैतापकर, संतोष आग्रे आणि दीपक पालशेतकर हे त्यांच्याकडे जमिनीचे व्यवहार करून ती आपल्या नावे करण्यासाठी वारंवार तगादा लावत असल्याचा आरोप आहे. ऑगस्ट २०२६ मध्ये (निश्चित तारीख आठवत नसल्याचे तक्रारीत नमूद) संतोष आग्रे आणि पराग कोळवणकर यांनी गोणवली येथील त्यांच्या घरी जाऊन जमिनीच्या व्यवहारावरून दबाव आणल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. या दबावामुळे व धमक्यांमुळे वडील मानसिक तणावाखाली होते, असा आरोप मुलगा नरेश कुळे यांनी केला आहे. आत्महत्येपूर्वी वडिलांनी संबंधितांकडून मिळालेल्या धमक्यांबाबत एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचेही तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.५० वाजण्यापूर्वी यशवंत कुळे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
वडिलांनी संबंधित चौघांच्या दबावाखाली येऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करीत मुलगा नरेश यशवंत कुळे यांनी २१ नोव्हेंबर रोजी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पराग कोळवणकर (रा. पडवे), संतोष जैतापकर (रा. नरवण), संतोष आग्रे (रा. तळवली) आणि दीपक पालशेतकर (रा. पालशेत, ता. गुहागर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत.


