(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा जिल्हा परिषद प्रभागात संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने ८ ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रामपंचायत पालीच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. हातखंबा जिल्हा परिषद प्रभागाचे समाजकल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात बंधारे उभारण्यासह पाणीटंचाई निवारणासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या सभेला पंचायत समिती हातखंबा गणाच्या सदस्या सौ. विद्या बोंबले, पंचायत समिती पाली गणाच्या सदस्या डॉ. पद्मजा कांबळे उपस्थित होत्या. तसेच नाणीज, कशेळी, खाणू, साठरे, पाली, वळके, वेळवंड, चरवेली, हातखंबा, कापडगाव आणि निवळी या गावांतील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, प्रशासक, ग्रामस्थ, आजी-माजी पदाधिकारी, उमेद बचत गटाच्या प्रतिनिधी, सीआरपी प्रभाग संघाचे पदाधिकारी, प्रभाग समन्वयक श्री. कोळेकर, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्रीमती प्राजक्ता नागवेकर, शाळांचे मुख्याध्यापक, तलाठी, पोलीसपाटील, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.
पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर सभेत भर देण्यात आला. त्यानुसार १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत जास्तीत जास्त वनराई बंधारे, कच्चे बंधारे आणि आवश्यकतेनुसार अन्य बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले. प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील योग्य ठिकाणांची पाहणी करून तातडीने कामाला सुरुवात करावी, असे निर्देश देण्यात आले. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १५ बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करून संभाव्य जागांची पाहणी आणि प्रत्यक्ष कामाची कार्यवाही दुसऱ्या दिवसापासूनच सुरू करण्याचे ठरविण्यात आले.
या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे. तसेच बंधारे उभारण्याच्या लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत ग्रामस्थांसह सर्व घटकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, पाणीटंचाई निवारणासाठी आपल्या कार्यक्षेत्रात कोणत्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत, याचा सविस्तर कृती आराखडा प्रत्येक ग्रामपंचायतीने तयार करून ९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पंचायत समिती, रत्नागिरी येथे सादर करावा, असे निर्देश ॲड. सुयोग कांबळे यांनी दिले.
पावसाचे पाणी अडवून त्याचा साठा वाढविणे, भूजलपातळी सुधारण्यास मदत करणे आणि आगामी काळात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे, हा या सामूहिक उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सभेच्या शेवटी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री. पी. एन. सुर्वे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


