(लांजा)
लांजा तालुक्यातील आसगे, बेनी आणि निवदेकरवाडी परिसरातील २६ वर्षीय तरुण मॅकॅनिक गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्याची नोंद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सचिन नारायण निवदेकर (वय २६) असे बेपत्ता तरुणाचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन निवदेकर हा ७ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता रत्नागिरी येथे कामावर जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतला नाही. नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराने विविध ठिकाणी शोध घेतला, तरी त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
सचिनची उंची सुमारे ५ फूट ५ इंच असून रंग सावळा, चेहरा त्रिकोणी, काळे वाढलेले केस आणि सरळ नाक अशी त्याची ओळख आहे. तो घरातून निघताना लाल रंगाचा कॉलर असलेला अर्ध्या बाह्यांचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची हाफ पॅन्ट परिधान केली होती. त्याच्याकडे पांढऱ्या रंगाची ॲक्टिव्हा दुचाकी तसेच ऑफ-व्हाईट रंगाचा OnePlus Nord मोबाईल असून त्याचा मोबाईल क्रमांक ९३७३४३७९७० आहे.
सचिनचा भाऊ सतीश नारायण निवदेकर यांनी ९ जुलै रोजी लांजा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे करीत आहेत.
सचिन निवदेकर यांच्याबाबत कोणालाही कोणतीही माहिती मिळाल्यास, त्यांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा लांजा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

