(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसुत यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती, मालगुंड आणि कोकण मराठी साहित्य परिषद, मालगुंड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या वेळी केशवसुतांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कोकण मराठी साहित्य परिषद, मालगुंड शाखेच्या अध्यक्षा नलिनी खेर यांनी केशवसुत यांच्या जीवनकार्याची माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या विविध सामाजिक कवितांचे सादरीकरण करून कवीला अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन तथा आबा पाटील, कोकण मराठी साहित्य परिषद, मालगुंड शाखेच्या अध्यक्षा नलिनी खेर, सचिव विलास राणे, सदस्य डॉ. संतोष केळकर, रामानंद लिमये, अरुण मोर्ये, शिरीष लिंगायत, शुभदा मुळ्ये, उज्ज्वला बापट आणि रामभाऊ गराटे आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय स्मारक व्यवस्थापन समिती आणि कोमसापच्या मालगुंड शाखेचे सर्व सदस्य तसेच स्मारकातील कर्मचारीही उपस्थित होते.
स्मारकाला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांनीही या जयंती कार्यक्रमात सहभागी होत केशवसुतांना अभिवादन केले. त्यांच्या सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या कवितांच्या सादरीकरणाचा आस्वाद घेत उपस्थितांनी कवीच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण केले.


