(रत्नागिरी)
रत्नागिरी सायकलिस्ट क्लब (आरसीसी) आयोजित किड्स सायक्लोथॉनला उत्तम प्रतिसाद मिळाला. यामध्ये ५०० हून अधिक बालदोस्त सहभागी झाले. या किड्स सायक्लोथॉनचा प्रवास आणि पर्यावरणपूरक सायकल चालवण्याचे बालदोस्तांना फायदे याविषयी रत्नागिरी आकाशवाणीच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमात मुलाखत सादर होणार आहे.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने आयोजित केलेल्या किड्स सायक्लोथॉनमध्ये ५०० हून अधिक मुलामुलींनी भाग घेतला. या सायक्लोथॉनची संकल्पना सुपरहिरोज ऑन व्हिल अशी होती. तसेच बेटी बचाओ, बेटी पढाओ या संकल्पनेचा प्रसार, प्रचार करण्यात आला. शहरामध्ये सायकलिंगचा प्रचार, प्रसार करण्यात रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची मोठी भूमिका आहे. लहान मुलांची सायक्लोथॉन यशस्वी करण्यासाठी पालक आणि प्रशासन, पोलिसांसह अनेकांचे सहकार्यसुद्धा लाभले.
आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर इंद्रधनुष्य कार्यक्रम प्रसारित होतो. १४ मे रोजी सकाळी ९.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत आणि किड्स सायक्लोथॉनमध्ये सहभागी अर्णव मकरंद पटवर्धन (फाटक हायस्कूल) आणि यज्ञा सुहास ठाकुरदेसाई (सर्वंकष विद्यामंदिर) या तिघांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदिका सोनाली सावंत यांनी घेतली असून कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे हे आहेत. सर्व रसिक श्रोत्यांनी आणि सायकल चालवणाऱ्या सर्वांनी आणि विशेष करून बालदोस्तांनी हा कार्यक्रम अवश्य ऐकावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्यासोबतच हा कार्यक्रम मध्यमलहरी ११४३ किलो हर्ट्स तसंच १०१.५. मेगा हर्टझ या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन या लाईव्ह मोबाईल ॲप वर रसिकश्रोत्यांना ऐकता येणार आहे. कार्यक्रमाचे प्रसारण झाल्यानंतर आकाशवाणी रत्नागिरी या youtube चॅनलवरही ही मुलाखत ऐकता येणार आहे.

