(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील चौगले लावगण शिप रिपेअर प्रा. लि. कंपनीत काम करत असताना एका तरुण कामगाराचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जहाजावरील मोटार दुरुस्तीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडल्याने कंपनीत हळहळ व्यक्त होत आहे.
सुदिपकुमार सुरेश सिंह (वय २७, रा. हिरापाकडटोला, मंगरहा, मानिकपूर, गोपलगंज, बिहार) असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (१६ जून) दुपारी सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदिपकुमार सिंह हे चौगले लावगण शिप रिपेअर प्रा. लि. येथे इलेक्ट्रोमेंट इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीमार्फत कार्यरत होते. कंपनीच्या बर्थ क्रमांक ४ वर उभ्या असलेल्या ‘शांतीसागर-१७’ या जहाजाच्या इंजिन रूममध्ये स्टारबोर्ड इंजिनवरील पंप रूममधील मोटार दुरुस्तीचे काम सुरू असताना त्यांना अचानक विजेचा शॉक बसला. शॉक लागल्यानंतर ते बेशुद्ध पडले.
घटनेनंतर सहकारी कामगारांनी तत्काळ त्यांना जहाजाबाहेर काढून कंपनीच्या रुग्णवाहिकेतून प्राथमिक आरोग्य केंद्र, खंडाळा येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, दुर्घटनेमागील नेमके कारण आणि सुरक्षाविषयक बाबींचा तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे कामगार सुरक्षा आणि औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षितता उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

