(पुणे / वृत्तसंस्था)
ज्यांच्या भारदस्त आवाजाने, डोळ्यांतून भावना व्यक्त करणाऱ्या अभिनयाने आणि साध्या राहणीमानाने कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, त्या ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. गोव्यातील डोना पावला येथील निवासस्थानी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७५ वर्षांचे होते. पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीसह देशभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली. पुण्याजवळील डोणजे गावात त्यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या नानांना अखेरचा निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले.
गोव्यातील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नाना पाटेकर यांचे पार्थिव विमानाने पुण्यात आणले गेले. खडकवासल्याजवळील डोनाजे येथील त्यांच्या फार्महाऊसवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नाना पाटेकर यांची अंतिम इच्छा होती की, त्यांचे शेवटचे कार्य हे पुणे डोणजे येथील शेतामध्येच व्हावे. हे ठिकाण नाना पाटेकर यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे होते. त्यामुळे त्यांच्या पार्थिवाला गोव्यातून एअरलिफ्ट करून पुण्यात आणण्यात आले.
नाना पाटेकर यांच्या अंत्यदर्शनासाठी डोणजे येथे चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. राजकीय क्षेत्रातील नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकार, साहित्यिक आणि नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले, सुनील तटकरे, माधुरी मिसाळ, आमदार गोपीचंद पडळकर, अर्जुन खोतकर, रुपाली चाकणकर, सदाभाऊ खोत आणि उदय सामंत यांनी पुष्पचक्र अर्पण करून नानांना अखेरचा निरोप दिला.
अभिनेते मकरंद अनासपुरे, नागराज मंजुळे, नीना कुलकर्णी, प्रवीण तरडे, सुरेश वाडकर, पुरुषोत्तम बेर्डे, सुशांत शेलार आणि लेखक अरविंद जगताप यांच्यासह ‘नाम फाउंडेशन’चे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या अभिनयातून विविध व्यक्तिरेखांना जिवंत करणाऱ्या आणि सामाजिक कार्यातून सामान्य माणसाशी नाते जोडणाऱ्या नानांच्या निधनाने अनेकांना दुःख झाले.
नाना पाटेकर यांना बुधवारी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांनी याबाबत एका मित्राला संदेश पाठवला; मात्र रात्र असल्याने मित्राला तो संदेश त्यावेळी दिसला नाही. संदेश पाहिल्यानंतर पहाटे ४ वाजता मित्र त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यावेळी नाना फरशीवर बेशुद्धावस्थेत पडलेले आढळले. मित्राने तातडीने केअरटेकरला बोलावले आणि रुग्णवाहिका मागवली.
रुग्णवाहिकेसोबत वैद्यकीय पथकही निवासस्थानी दाखल झाले. डॉक्टरांनी नानांना सीपीआर देऊन त्यांना प्रतिसाद मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले. तेथेही सीपीआर देण्यात आला, परंतु पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी (कर्करोग) विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी ही माहिती दिली.
गोव्यातून नाना पाटेकर यांचे पार्थिव विशेष एअर अॅम्ब्युलन्सने पुणे विमानतळावर आणण्यात आले. तेथून रस्तेमार्गे पार्थिव डोणजे येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आल्यानंतर रात्री उशिरा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना हसवणारे, रडवणारे आणि अंतर्मुख करणारे नाना यांना निरोप देताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले.
नाना पाटेकर यांनी रंगभूमीपासून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गमन’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘परिंदा’ (१९८९) या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला, तर ‘क्रांतिवीर’ (१९९४) मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयशैलीने त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण केले.
‘अग्नी साक्षी’, ‘खामोशी : द म्युझिकल’, ‘अब तक छप्पन’, ‘अपहरण’, ‘राजनीती’, ‘वेलकम’ आणि मराठीतील ‘नटसम्राट’ यांसह अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अभिनेता म्हणून यश मिळवतानाच त्यांनी दिग्दर्शक आणि लेखक म्हणूनही काम केले. चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल २०१३ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मात्र, नानांचे व्यक्तिमत्त्व केवळ रुपेरी पडद्यावरील अभिनयापुरते मर्यादित नव्हते. समाजातील वंचित आणि संकटग्रस्त घटकांसाठी काम करण्याचा ध्यास त्यांनी कायम जपला. अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या साथीने त्यांनी ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना केली. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करणे, शेतकरी आत्महत्यांमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना आधार देणे, विधवांच्या रोजगाराची व्यवस्था करणे, मुलांच्या भविष्याचा विचार करणे, जलसंधारण आणि रोजगारनिर्मिती यांसारख्या कामांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
अनेक शेतकरी कुटुंबांना मदत करण्यासोबतच विधवांसाठी रोजगाराची साधने उभारणे आणि गावांमध्ये कालवे, नाले तसेच जलसंधारणाची कामे करण्यासाठीही त्यांनी योगदान दिले. प्रसिद्धीच्या झगमगाटात वावरतानाही जमिनीशी नाते कायम ठेवणारे आणि लोकहितासाठी सातत्याने कार्यरत राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून नाना पाटेकर यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने अभिनयक्षेत्रातील एक प्रभावी कलाकार आणि सामाजिक कार्यासाठी झटणारा संवेदनशील माणूस काळाच्या पडद्याआड गेला.


