( रत्नागिरी / वार्ताहर )
राजस्थानमधील आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी भरतपूर नगरपरिषदेची जबाबदारी भाजपने महाराष्ट्र विधान परिषदेचे कोकण विभागातील आमदार प्रमोद जठार यांच्यावर सोपविली आहे. त्यांची भरतपूर नगरपरिषदेसाठी भाजपचे पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राजस्थानमधील या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पक्ष निरीक्षकपदाची प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत भरतपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी आमदार प्रमोद जठार यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आमदार प्रमोद जठार यांनी भाजपच्या संघटनेत विविध स्तरांवर काम करताना पक्षविस्तार आणि संघटनात्मक बांधणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महाराष्ट्र भाजपमध्ये प्रदेश पातळीपासून विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी प्रभावीपणे पार पाडल्या आहेत. तसेच भाजपचे पक्ष प्रवक्ते म्हणून त्यांनी माध्यमांसमोर पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडली आहे.
पक्ष संघटनेचा प्रदीर्घ अनुभव, विविध स्तरांवरील कामाचा आवाका आणि पक्षासाठी केलेल्या योगदानाची दखल घेत भाजपने त्यांच्यावर राजस्थानमधील नगरपालिका निवडणुकीची ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. भरतपूर नगरपरिषद क्षेत्रात पक्षाची संघटनात्मक तयारी, निवडणूक नियोजन आणि स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.
आमदार प्रमोद जठार यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

