(मुंबई)
आता केवळ मराठीच नव्हे, तर सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर राज्यगीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ गाणे बंधनकारक करण्यात आले आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाईल, असा इशारा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. शालेय सभेत राष्ट्रगीतासोबतच राज्यगीतही विद्यार्थ्यांनी मानवंदनेने गावे, अशी सक्ती करण्यात आली आहे. याआधी हा नियम मुख्यतः मराठी शाळांसाठी लागू होता, मात्र आता सर्वच माध्यमांच्या शाळांना त्याचे पालन करावे लागेल.
याशिवाय, शिष्यवृत्ती परीक्षेबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी फक्त चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती. त्यानंतर पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनाही यामध्ये समाविष्ट करण्यात आले. आता चौथी, पाचवी, सातवी आणि आठवी या चारही इयत्तांमधील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार असून, अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा हा यामागचा उद्देश असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी ‘हेल्थ कार्ड’
शालेय शिक्षण विभाग केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षणपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडेही लक्ष देणार आहे. याआधी आरोग्य तपासण्या केवळ औपचारिकतेपुरत्या मर्यादित होत्या. मात्र, आता पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाईल आणि त्यानंतर त्यांना ‘हेल्थ कार्ड’ दिले जाईल. हे हेल्थ कार्ड विद्यार्थ्यांच्या भविष्यातील अनेक गरजांसाठी उपयुक्त ठरेल, असे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.