(नाशिक)
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून (SIT) नाशिकमध्ये चौकशी करण्यात आली. “तपास अधिकाऱ्यांना जी माहिती हवी असेल, त्यासाठी मी पूर्ण सहकार्य करणार,” असे चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. अशोक खरात प्रकरणामुळे वादात सापडलेल्या रूपाली चाकणकर यांनी यापूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्या आज पुण्याहून नाशिकमध्ये दाखल होत एसआयटीसमोर चौकशीसाठी हजर झाल्या. यावेळी त्या आपल्या वकिलांसह चौकशीसाठी पोहोचल्या होत्या.
पदाचा गैरवापर केल्याचा आरोप
महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप रूपाली चाकणकर यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच, भोंदूबाबा अशोक खरात याच्या ‘शिवनिका’ संस्थेच्या विश्वस्तपदावरही त्या कार्यरत होत्या. त्यामुळे आर्थिक व्यवहार आणि संबंधित खात्यांबाबत एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी त्यांची सविस्तर चौकशी केली.
“बनावट खात्यांशी माझा संबंध नाही”
चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, “एसआयटी पथकाकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यांना जे प्रश्न विचारायचे आहेत, त्याची उत्तरे देण्यासाठी मी नाशिकला आले आहे. तपास यंत्रणेला आवश्यक असलेले सर्व सहकार्य करणे ही माझी जबाबदारी आहे.” समता पतसंस्था आणि जगदंबा पतसंस्थेतील अशोक खरातच्या बँक खात्यांशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला. “ती सर्व खाती बनावट आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरे समोर येतील,” असेही त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या, मला असं वाटतं की अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनात आहेत. ज्यावेळेस हा तपास पूर्ण होईल. त्या तपासातूनच तुमच्या प्रश्नांना उत्तरं मिळतील. तर अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांची आपल्याला कल्पना नाही असे चाकणकर म्हणाल्या.
बहिण आणि मुलाचाही जबाब नोंदवला
दरम्यान, एप्रिल महिन्यात शिर्डी पोलिसांनी रूपाली चाकणकर यांच्या बहिणी प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मय चाकणकर यांचे जबाब नोंदवले होते. संबंधित बँक खाती आमची नसून आम्ही ती उघडलेली नाहीत, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र खाते उघडण्यासाठी वापरण्यात आलेली कागदपत्रे आमचीच असल्याचे त्यांनी मान्य केले असल्याची माहिती समोर आली आहे.
रुपाली चाकणकर या भोंदू अशोक खरात याला गुरू मानत होत्या. त्यांचे खरात सोबतचे काही फोटोही समोर आले. त्यात त्या पाद्यपूजा करतानाचाही फोटो होतो. तर याप्रकरणात काहूर उठल्यानंतर चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर महिला लैंगिक अत्याचार, आर्थिक फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवल्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणातील गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने एसआयटीमार्फत तपास सुरू करण्यात आला आहे. नाशिकमधील चौकशीनंतर अशोक खरातला शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून सध्या त्याची पुढील चौकशी सुरू आहे.

