(सिंधुदुर्ग / मालवण)
गणेशोत्सवासाठी सासरवाडी आंबेरी-वाकवाडी येथे आलेल्या कुटुंबावर गुरुवारी सकाळी दुर्दैवी प्रसंग ओढवला. नदीपलीकडे शेतीच्या कामासाठी होडीतून जात असताना अचानक होडी नदीपात्रात बुडाल्याने चौघेजण पाण्यात पडले. यावेळी होडी चालविणारे स्वप्नील संदीप वाक्कर यांनी प्रसंगावधान राखत दोघांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले; मात्र दर्शन चंद्रकांत टकारिया (रा. गुजरात, सध्या मुंबई) हे नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने बेपत्ता झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे दहाच्या सुमारास ही घटना घडली. नदीत होडी बुडाल्यानंतर चौघेजण पाण्यात पडले. स्वप्नील संदीप वाक्कर यांनी तातडीने हालचाल करत दोघांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळविले. मात्र होडीत असलेले दर्शन टकारिया यांचा नदीच्या प्रवाहात शोध लागला नाही.
घटनेची माहिती मिळताच दर्शन टकारिया यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक पातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले. त्यानंतर स्कुबा डायव्हिंग पथकाच्या मदतीने नदीपात्रात युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर दर्शन टकारिया यांचा मृतदेह सापडून आला.
या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. दर्शन टकारिया यांचा मृतदेह सापडल्याने आंबेरी-वाकवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.


