(मुंबई / वृत्तसंस्था)
जिद्द, धैर्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर अवघ्या सहा वर्षांच्या आर्य नायकी हिने अरबी समुद्रात १७ किलोमीटर अंतर पोहून पूर्ण करण्याची विक्रमी कामगिरी केली आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील या चिमुकलीने २ ऑक्टोबर रोजी मुंबईत मध्यरात्रीच्या अंधारात पोहण्याचे आव्हान स्वीकारत अवघ्या ३ तास ५१ मिनिटांत अटल सेतूजवळून गेटवे ऑफ इंडियापर्यंतचे अंतर पार केले. या कामगिरीनंतर आर्यने आपल्या आई-वडिलांसह शिर्डी येथे जाऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि विक्रमादरम्यान मिळालेली ट्रॉफी साईबाबांच्या चरणी अर्पण केली.
विजयवाड्यातील जीआयजी इंटरनॅशनल स्कूलमध्ये यूकेजीमध्ये शिक्षण घेणाऱ्या आर्यने मुंबईत ही कामगिरी केली. २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एक वाजता तिने अटल सेतूजवळून पोहण्यास सुरुवात केली. खोल पाणी, मोठ्या लाटा आणि सभोवतालचा अंधार अशा आव्हानात्मक परिस्थितीत तिने गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचून १७ किलोमीटरचा टप्पा निर्धारित वेळेत पूर्ण केला. मध्यरात्री समुद्रात पोहणे हे अनुभवी जलतरणपटूंसाठीही आव्हानात्मक मानले जाते. मात्र, आर्यने कोणतीही भीती न बाळगता लक्ष्य गाठले. सहा वर्षांच्या वयोगटात इतक्या कमी वेळेत समुद्रात १७ किलोमीटर अंतर पूर्ण करणारी ती जगातील पहिली आणि सर्वांत तरुण जलतरणपटू ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. या मोहिमेचे संपूर्ण आयोजन मुंबईचे नौदल अधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
समुद्रातील विक्रमी कामगिरीनंतर आर्य आणि तिची आई डिंपल कृष्णा यांनी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तिने आपल्या विक्रमी कामगिरीत मिळालेली ट्रॉफी साईबाबांच्या चरणी अर्पण करून आशीर्वाद घेतले. साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापनाकडून आर्य आणि तिच्या कुटुंबीयांसाठी दर्शन व आरतीची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, साईबाबांच्या दर्शनानंतर आर्यने आपल्या निरागस शैलीत “ओम साईराम.. थँक्यू साईबाबा” असे म्हणत आनंद व्यक्त केला. तिच्या समुद्रातील विक्रमी कामगिरीसह साईदर्शनाचेही उपस्थित भाविकांनी कौतुक केले.
आर्यला लहानपणापासूनच पोहण्याची आणि साहसी उपक्रमांची आवड असल्याचे तिची आई डिंपल कृष्णा यांनी सांगितले. गेल्या वर्षी आर्यने जर्मनी ते ऑस्ट्रिया दरम्यान समुद्रातील ६.३ किलोमीटरचे अंतर यशस्वीपणे पोहून पूर्ण केले होते. त्यानंतर यंदा मुंबईतील १७ किलोमीटरचे अधिक खडतर आव्हान तिने पूर्ण केले. मध्यरात्रीच्या अंधारात अथांग समुद्रात तिने दाखवलेले धैर्य आणि आत्मविश्वास शब्दांत व्यक्त करणे कठीण असल्याची भावना डिंपल कृष्णा यांनी व्यक्त केली. अवघ्या सहा वर्षांच्या मुलीने एवढे मोठे आव्हान स्वीकारून ते यशस्वीपणे पूर्ण करणे ही कुटुंबासाठी अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. साईबाबांच्या कृपेने आणि आशीर्वादानेच हे सर्व शक्य झाल्याचे त्या म्हणाल्या.


