(धुळे)
डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली असून, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा थेट आरोप गौरींच्या कुटुंबीयांनी केला आहे. गौरींचे पती अनंत गर्जे हे मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए असल्याने प्रकरण अधिकच संवेदनशील झाले आहे. अनंत गर्जे सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, तपास वेगाने सुरू आहे.
गौरींना अनंत गर्जे मारहाण करायचा, असे गंभीर आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आले आहेत. “आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही, तिची हत्या करण्यात आली आहे,” असा दावा तिचे वडील अशोक पालवे आणि आई अलकनंदा पालवे यांनी केला होता.
अशोक पालवे काय म्हणाले होते
गौरी पालवे – गर्जे यांच्या वडिलांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, गौरीने गळफास घेतला असता तर तिच्या मानेवर तशा खुणा असत्या. मात्र तिच्या छातीवर मारहाणीच्या खुणा होत्या, तिच्या डोक्याला मार लागलेला होता. मारहाणीत तिचा मृत्यू झाला असा माझा दावा आहे. तपास अधिकारी म्हणतात असे काही नाही. पण, आम्ही डोळ्यांनी हे पाहिले आहे. त्या खुणा कशा आल्या असा आमचा सवाल आहे. माझ्या मुलीला मारण्यात आले आहे. ती आत्महत्या करू शकत नाही, ती खूप स्ट्राँग होती. नातेवाईक यायच्या आधी पंचनामा का करण्यात आला? तुम्ही तुमच्या बहिणीला फोन का केले? तुम्ही यात दोषी नाही तर फरार का झाले? याचे उत्तर द्यावे,” असे ते यावेळी म्हणाले होते.
पंकजा मुंडेंची पिंपळनेरला भेट
घटनेनंतर मंत्री पंकजा मुंडे स्वतः बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर गावात गेल्या आणि गौरींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी पालवे कुटुंबियांनी आपली व्यथा, वेदना आणि न्यायाची मागणी त्यांच्या पुढे मांडली. पंकजा मुंडेंसमोर गौरींचे वडील अशोक पालवे टाहो फोडल्याने वातावरण क्षणातच भावनिक झाले. मुंडेही अश्रू रोखू शकल्या नाहीत.
कोणालाही फोन केलेला नाही, वाचवण्याचा प्रयत्न नाही – पंकजा मुंडे
गौरींना होत असलेल्या त्रासाबाबत मला काहीच माहिती नव्हती, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या : “मला गौरीवर अत्याचार होत असल्याची कल्पनाच नव्हती. असती तर अनंतच्या दोन कानाखाली लावल्या असत्या. भगवान बाबा आणि मुंडे साहेबांची शपथ घेऊन सांगते, या प्रकरणात मी कोणालाही फोन केलेला नाही, किंवा कोणालाही या प्रकरणी वाचवलेले नाही. माझ्याकडे 10 पीए 36 कर्मचारी आहेत. पगारी नोकरांच्या घरात काय सुरूय ते प्रत्येकाला कसे कळणार?” तो माझा पीए असला किंवा माझा मुलगा असला तरी मी अशा गोष्टींना कधीही पाठीशी घातलं नाही आणि घालणार पण नाही.
गुन्ह्यातून कोणीही सुटणार नाही – मुंडेंची भूमिका
“या प्रकरणाचा सखोल तपास व्हायलाच हवा. पोलिसांना त्यांचा तपास करु द्यायला हवा, एक दोन दिवसात तपास होणार नाही. माझी नाचक्की झाली.. मला याबाबत कोणी कधी सांगितलं नाही…. कुणाच्याही आहारी जाऊ नका, जरा धीर धरा… तपासात सगळ्या गोष्टी समोर येतील.. न्यायदेवतेवर विश्वास ठेवा, असेही पंकजा मुंडे म्हणाले. जो कोणी दोषी असेल तर त्याला शिक्षा होणारच, असेही मुंडे म्हणाल्या. पोलिस सध्या घटनास्थळ, जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट अशा सर्व बाबींची सखोल छाननी करत आहेत.

