(पुणे / वृत्तसंस्था)
गुंतवणुकीतून अवघ्या आठवडाभरात चौपट परतावा मिळवून देण्याचे प्रलोभन आणि त्यानंतर मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत सायबर चोरट्यांनी पुण्यातील एका ७० वर्षीय सेवानिवृत्त नागरिकाला तब्बल २ कोटी १० लाख रुपयांचा गंडा घातला आहे. सोशल मीडियावरील जाहिरातीच्या माध्यमातून सुरू झालेल्या या फसवणुकीत बनावट गुंतवणूक योजना आणि डिजिटल अरेस्टची धमकी अशा दोन्ही प्रकारांचा वापर करण्यात आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे धाव घेतली असून, पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील मुंढवा परिसरात हे ७० वर्षीय सेवानिवृत्त नागरिक एकटेच राहतात. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरू होते. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या एका गुंतवणूक योजनेच्या जाहिरातीवर त्यांची नजर पडली. या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध उद्योगपती, केंद्रीय मंत्री आणि खेळाडूंचे छायाचित्र वापरून गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
जाहिरातीमध्ये दिलेल्या संपर्क क्रमांकावर फोन केल्यानंतर संबंधित व्यक्तीने ही गुंतवणूक कंपनी यूकेस्थित असल्याचे सांगितले. सुरुवातीला २० हजार रुपये गुंतवण्यास सांगून आठवड्याभरात त्याच्या चौपट म्हणजेच ८० हजार रुपये परत देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकाने यूपीआयच्या माध्यमातून २० हजार रुपये पाठवले. ठरल्याप्रमाणे आठवड्यानंतर त्यांच्या गुंतवणूक खात्यात ८० हजार रुपये जमा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधित योजनेवर त्यांचा विश्वास बसला.
यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना सुरुवातीला पाच लाख रुपये आणि पुढे टप्प्याटप्प्याने मोठ्या रकमा गुंतवण्यास प्रवृत्त केले. एका वेळी त्यांनी १ कोटी ७ लाख रुपये हस्तांतरित केले. त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये रक्कम वाढून २ कोटी ८० लाख रुपये झाल्याचे दर्शवण्यात आले. त्यामुळे त्यांनी गुंतवलेले पैसे काढण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना रक्कम काढता आली नाही.
दरम्यान, त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. संबंधित व्यक्तीने आपण दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) अधिकारी असल्याची बतावणी केली. ज्येष्ठ नागरिकांचा मोबाइल क्रमांक एका गुन्ह्याशी संबंधित असल्याचा दावा करून मुंबई क्राइम ब्रँचकडून त्यांना फोन येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक होण्याची धमकी देण्यात आली.
चौकशीसाठी पैसे जमा करण्यास सांगून तपास पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम परत केली जाईल, असे सायबर चोरट्यांनी त्यांना सांगितले. अटकेच्या भीतीमुळे ज्येष्ठ नागरिकांनी ८ ते १५ जुलै या कालावधीत आणखी १ कोटी ४ लाख रुपये हस्तांतरित केले. त्यानंतर संबंधित आरोपींनी संपर्क बंद केला. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.
गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन करणे आणि त्यानंतर तपास यंत्रणांच्या नावाने अटकेची भीती घालून पैसे उकळणे, अशा पद्धतीने हा प्रकार घडल्याचे तक्रारीतून समोर आले आहे. या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


