(लांजा / रत्नागिरी)
लांजा तालुक्यातील कुवे-वारिशेवाडी येथील २७ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिच्यावर विविध रुग्णालयांत उपचार करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच रत्नागिरीतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला. शुभ्रा ऋषिकेश यादव (वय २७, रा. कुवे वारिशेवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभ्रा यादव यांचा विवाह ऋषिकेश प्रकाश यादव यांच्याशी १७ फेब्रुवारी २०२२ रोजी झाला होता. ऋषिकेश हे महावितरण कंपनीत वायरमन म्हणून कार्यरत आहेत. ३ ऑक्टोबर रोजी ते झापडे, ता. लांजा येथे पोलवरील विद्युत वाहिनीचे काम करत असताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे वडील प्रकाश यादव यांचा त्यांना फोन आला. शुभ्रा यांनी घरातील बेडरूममधील पाईपला साडीच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकाश यादव यांनी पाहिले होते. त्यांनी तातडीने साडी कापून मुलगा अनमोल यांच्या मदतीने शुभ्रा यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना प्राथमिक उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी पुढील उपचारांची आवश्यकता असल्याने शुभ्रा यांना १०८ रुग्णवाहिकेतून रत्नागिरीतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलविले. तेथे उपचार घेतल्यानंतर ऋषिकेश यादव यांनी ४ ऑक्टोबर रोजी त्यांना खासगी रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील मेट्रो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मेट्रो हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर ६ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास शुभ्रा यांना पुन्हा रत्नागिरीतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान ७ ऑक्टोबर रोजी पहाटे १.३४ वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय माहोलकर यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या घटनेची नोंद लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ५२/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ नुसार करण्यात आली आहे. घटनेमागील कारणाबाबत पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.


