(रत्नागिरी / प्रतिनिधी)
लांजा तालुक्यातील मौजे कुरणे (सर्व्हे नं. १९१/१) या राखीव वनक्षेत्रात झालेल्या सागवृक्ष चोरतुट प्रकरणात वन विभागाने मोठी कारवाई केली आहे. आतापर्यंत अकरा संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असून, एकूण ५ वाहने आणि सागवृक्षाचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त मालाची एकत्रित किंमत सुमारे ८३ लाख रुपये एवढी आहे.
३० ऑगस्ट २०२५ रोजी जंगल फिरतीदरम्यान वनपाल व वनरक्षक, लांजा यांनी कुरणे वनक्षेत्रात सागवृक्षांची सात झाडे अवैधरीत्या तोडण्यात आल्याचे निदर्शनास आणले होते. त्यानंतर नोंदविलेल्या गुन्हा क्र. C०३/२०२५ च्या तपासात आरोपींचा सहभाग उघडकीस आला. दिनांक २४ सप्टेंबर रोजी संशयित आरोपी मनोज संजय पाटणकर, मंदार संजय पाटणकर, अजय नागूप्रसाद निषाद, शत्रुघ्न दत्ताराम गोठणकर, विजयकुमार रामशंकर निषाद, मंदार मनमोहन बारस्कर आणि शुभम रवींद्र गुरव (सर्व रा. कुंभवडे) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून क्रेन (MH09 GM 0552) आणि ३१ नग (७.४९५ घ.मी.) साग माल जप्त करण्यात आला.
त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी पुढील आरोपी संजय शांताराम गुरव (रा. खारेपाटण, ता. कणकवली), श्रेयस गोपाळ बारस्कर, प्रकाश गुणाजी पुजारे, अतुल भाऊ जाधव (सर्व रा. कुंभवडे) यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी आणखी एक क्रेन (MH08 BE 4185) तसेच बोलेरो पिकअप (MH08 BC 2005) आणि इतर वाहने जप्त करण्यात आली. आरोपी संजय गुरव यांनी पूर्वी कुरणे येथून चोरीचा साग माल ट्रकमध्ये भरून मौजे कुंभवडे येथे उतरवल्याचे कबूल केले. त्यासाठी वापरलेला ट्रक (MH08 W 8424) सुद्धा राजापूर वनपरिमंडळ कार्यालयात हजर करून जप्त करण्यात आला. आरोपी मंदार बारस्कर यांनी मजुरांना पोहोचविण्यासाठी वापरलेली बोलेरो पिकअप (MH08 AP 8584) देखील वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली.
आजपर्यंत झालेल्या कारवाईत २ क्रेन, १ ट्रक, २ बोलेरो पिकअप अशी ५ वाहने आणि ५४ नग (३.०२४ घ.मी.) साग माल जप्त झाला आहे. जप्त साग मालाची शासकीय दरानुसार किंमत रु. २,१२,०७०/- असून वाहनांची अंदाजे किंमत रु. ८१ लाख आहे. जप्त साहित्य राजापूर वनरक्षकांच्या ताब्यात पावतीवर देण्यात आले आहे. या तपासात विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई (रत्नागिरी), सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियांका लगड, मुख्य वनसंरक्षक गुरुप्रसाद (कोल्हापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, जितेंद्र गुजले, पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे (लांजा), पोलीस निरीक्षक अमित यादव (राजापूर) तसेच अनेक वनपाल व वनरक्षक सहभागी झाले.
वन विभागाच्या वतीने जनतेस आवाहन करण्यात आले आहे की, अशा प्रकारच्या बेकायदेशीर घटनांची माहिती अथवा वन्यप्राणी अडचणीत आल्यास टोल फ्री १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा.

