(लांजा)
जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत लांजा तालुक्यातील शिपोशी बीटाच्या शालेय हिवाळी बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा विस्तार अधिकारी चंद्रकांत पावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली वेरवली हायस्कूल या ठिकाणी संपन्न झाल्या. यामध्ये शिपोशी बेटातील पाच केंद्रांनी सहभाग घेतला होता. केंद्रस्तरावरून जिंकून आलेल्या पाच केंद्रातील संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये आसगे केंद्रातील तब्बल ७ संघाचे प्रतिनिधित्व देवधे मणचे शाळेने केले होते.
बीट स्तरीय स्पर्धेत ७ खेळांचे प्रतिनिधित्व करताना खोखो मोठा गट मुलगे, खो खो लहान गट मुलगे, खोखो लहान गट मुली, लंगडी लहान गट मुली, लंगडी मोठा गट मुली, कबड्डी मोठा गट मुली यामध्ये विजेतेपद पटकावले तर खोखो मोठा गट मुली यामध्ये उपविजेतेपद पटकावले आहे. तसेच वैयक्तिक अनेक खेळांमध्ये विजेतेपद मिळवले आहे. वरील सर्व विजयामुळे जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफीचा मान देखील शाळा देवधे मणचे ला मिळाला आहे.
गतवर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या तसेच जिल्हास्तरावर विजेतेपट पटकावणाऱ्या शाळा देवधे मणचे च्या विद्यार्थ्यांनी यावर्षी देखील खेळातील आपले प्राविण्य कायम ठेवले आहे. शाळेला नेहमी प्रोत्साहन देणारे आणि वेळोवेळी मदतीचा हात घेऊन येणारे जिल्हा परिषद रत्नागिरीचे माजी शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर यांनी सर्व विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा देत कौतुक केले आहे.
या सर्व विजयाचे श्रेय शाळेतील शिक्षक श्री नंदकुमार पाटोळे यांना जाते. सतत सराव आणि योग्य मार्गदर्शन यामुळेच हे सर्व शक्य झाले असे शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष जाधव यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षक श्री नानासाहेब गोरड व उपशिक्षिका सौ सायली तिखे व मुख्याध्यापक श्री संतोष जाधव यांचे देखील सर्व खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे.

