(संगमेश्वर / एजाज पटेल)
‘माणुसकी संपत चालली आहे’, अशी खंत अनेकदा व्यक्त केली जाते. त्यातही पोलिसांच्या खाकी वर्दीकडे समाजाचा एक वर्ग केवळ कठोर, नियमांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा म्हणून पाहतो. मात्र, या खाकी वर्दीमागेही एक संवेदनशील, मायेने ओथंबलेले मन असते, याचा प्रत्यय लांजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजणारी येथे घडलेल्या एका भीषण अपघातात आला.
रक्ताच्या थारोळ्यात अडकलेल्या, मृत्यूशी झुंज देणाऱ्या आणि पाण्याच्या एका घोटासाठी व्याकूळ झालेल्या ट्रेलर चालकासाठी महिला पोलीस कॉन्स्टेबल सुजाता महाडिक या अक्षरशः देवदूत ठरल्या. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी अपघातग्रस्त केबिनमध्ये पोहोचून जखमी चालकाला पाणी पाजले. त्यांच्या या माणुसकीपूर्ण कृतीने उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले असून, सोशल मीडियावरही त्यांच्या कार्याचे जोरदार कौतुक होत आहे.
काळजाचा थरकाप उडवणारा अपघात
रत्नागिरीहून गोव्याकडे जाणाऱ्या एका ट्रेलरचा अंजणारी येथे भीषण अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की, ट्रेलरच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला. चालक लोखंडी पत्र्यांमध्ये गंभीर जखमी अवस्थेत अडकला होता. शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असतानाही तो मदतीसाठी आर्त हाक मारत होता.
“मुझे बचाओ… मुझे केबिन से बाहर निकालो…” अशी त्याची वेदनादायी आरोळी घटनास्थळी उपस्थित प्रत्येकाच्या काळजाला चिरून जात होती. असह्य वेदनांनी तडफडणारा तो चालक पाण्याच्या एका घोटासाठी व्याकूळ झाला होता.
पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांचा खंबीर आधार
घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. परिस्थिती अत्यंत धोकादायक असतानाही पोलीस निरीक्षक बगळे यांनी केबिनमध्ये हात घालून जखमी चालकाचा हात हातात घेत त्याला धीर दिला.
“आप घबराओ नहीं… आपको कुछ नहीं होगा…”
मृत्यूशी झुंजणाऱ्या त्या चालकासाठी हे शब्द मोठा मानसिक आधार ठरले. त्याचवेळी त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.
पाण्याच्या एका घोटासाठी तडफड…
अपघातातील गंभीर दुखापतींमुळे चालकाला स्वतःच्या हाताने पाण्याची बाटलीही धरता येत नव्हती. अपघाताने आणि भीतीने शरीरातील शक्ती संपली होती. तो केवळ तहानेने व्याकूळ होऊन मदतीची याचना करत होता.
खाकीतील ‘माऊली’ ठरल्या सुजाता महाडिक
ही असहाय अवस्था पाहून महिला पोलीस कॉन्स्टेबल सुजाता महाडिक क्षणाचाही विलंब न करता पुढे सरसावल्या. अपघातग्रस्त केबिन कधीही कोसळण्याचा धोका असतानाही त्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा केली नाही. पाण्याची बाटली हातात घेऊन त्या काळजीपूर्वक केबिनमध्ये पोहोचल्या. अत्यंत अवघड परिस्थितीत शरीर झुकवत त्यांनी जखमी चालकाच्या तोंडाला पाण्याची बाटली लावली आणि त्याची तहान भागवली.
त्या काही क्षणांत त्या चालकासाठी त्या केवळ पोलीस नव्हत्या, तर संकटसमयी धावून आलेली एक ‘माऊली’ होत्या. त्यांच्या या मायेच्या स्पर्शाने आणि पाण्याच्या प्रत्येक घोटाने उपस्थित अनेकांचे डोळे नकळत पाणावले.
पोलिसांविषयीचा समज बदलणारा प्रसंग
या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले की, खाकी वर्दी ही केवळ कायद्याची अंमलबजावणी करणारी नसून संकटाच्या वेळी माणुसकीने धावून येणारीही असते.
घटनास्थळावरील छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत असून, “खाकीतील माऊलीला सलाम”, “माणुसकी अजूनही जिवंत आहे”, अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर उमटत आहेत.
पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी दिलेला मानसिक आधार, स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी केलेले अथक बचावकार्य तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल सुजाता महाडिक यांनी दाखवलेली माणुसकी आणि धाडस यामुळे लांजा पोलिसांच्या कार्याचा मान अधिक उंचावला आहे.

