(लांजा / वार्ताहर)
लांजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेरवली रामगाव, लाडवाडी येथे राहणाऱ्या ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिला वैशाली विलास हेगिष्टे यांच्या निर्घृण खुनाचा आणि सोन्याचे दागिने जबरीने लुटल्याच्या गंभीर गुन्ह्याचा रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत छडा लावला आहे. कर्जबाजारीपणामुळे हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रमोद प्रकाश खेडेकर (रा. वेरवली खुर्द, कातळवाडी, ता. लांजा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चोरीचा संशय येऊ नये, यासाठी त्याने मृत महिलेच्या हातात सोन्याच्या बांगड्यांऐवजी बनावट बांगड्या घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
१९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा ते साडेअकराच्या दरम्यान वैशाली हेगिष्टे या घरी एकट्याच असल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने त्यांचा निर्घृण खून करून दोन्ही हातांतील सोन्याच्या दोन बांगड्या आणि दोन पाटल्या जबरदस्तीने काढून घेतल्या. दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात येऊ नये, या उद्देशाने आरोपीने त्यांच्या हातात नकली बांगड्या घातल्या. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३०९(४) व ३३२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भरदिवसा घडलेल्या या गंभीर घटनेची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, लांजाचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे आणि राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली तीन स्वतंत्र तपास पथके तयार करून तपासासाठी रवाना करण्यात आली.
पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांची पडताळणी केली. तसेच सायबर आणि तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून तपासाची दिशा निश्चित केली. या तपासातून घटनास्थळापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या प्रमोद खेडेकर याच्याविषयी संशय निर्माण झाला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, डोक्यावर असलेल्या कर्जामुळे हा गुन्हा केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या खुनाच्या गुन्ह्याची अवघ्या १२ तासांत उकल करण्यात पोलिसांना यश आले.
या तपास आणि कारवाईत पोलीस अधिकारी देवकन्या मैदाड, अमोद सरंगले, संदीप ओगले, प्रशांत बोरकर तसेच पोलीस अंमलदार सचिन भुजबळराव, नितेश राणे, प्रियांका कांबळे, प्रतीक्षा राणे, संजय मारळकर, विजय आंबेकर, गणेश सावंत, योगेश नार्वेकर, भैरवनाथ सवाईराम, दत्ता कांबळे व अतुल कांबळे यांनी मोलाची भूमिका बजावली. ज्येष्ठ महिलेच्या खुनाचा अवघ्या १२ तासांत छडा लावल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.


