( चिपळूण/ रत्नागिरी प्रतिनिधी )
चिपळूण शहरातील वालोपे परिसरात मुंबई-गोवा महामार्गालगतच्या उड्डाणपुलाजवळ घडलेल्या नवनाथ बबन कांबळे यांच्या निर्घृण हत्याकांडाचा छडा लावण्यात चिपळूण पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (एलसीबी) मोठे यश आले आहे. विशेष म्हणजे, या गुन्ह्यातील संशयित आरोपी पवन आंबेडे हा सराईत गुन्हेगार असून, तो चक्क तडीपार असतानाही जिल्ह्यात मोकाट वावरत असल्याचे या कारवाईतून उघड झाले आहे. मुंबईतून कोल्हापूरच्या दिशेने पळ काढण्याच्या तयारीत असलेल्या या गुन्हेगाराला पोलिसांनी कोल्हापुरात सापळा रचून अटक केली असून, प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
१६ नोव्हेंबरच्या रात्री सव्वाआठ ते १७ नोव्हेंबरच्या सकाळी सात वाजेच्या दरम्यान वालोपे येथील उड्डाणपुलाजवळ नवनाथ कांबळे यांचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला होता. डोक्याच्या पुढील डाव्या बाजूला जांभा दगडाने निर्घृण प्रहार केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी रक्ताने माखलेला दगडही आढळला होता. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. कायद्याचा धाक झुगारून तडीपार गुन्हेगाराने महामार्गालगत हा रक्तरंजित खेळ केल्याने परिसरात मोठी दहशत पसरली होती. कोणताही प्रत्यक्ष पुरावा नसल्याने हा तपास पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. मात्र, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पिंजून काढले असता, गुन्हा घडलेल्या कालावधीत पवन आंबेडे घटनास्थळी वावरत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच्या मोबाईल क्रमांकांचे सीडीआर (Call Detail Records) आणि साक्षीदारांच्या जबाबावरून त्याची उपस्थिती पक्की झाली.
आरोपीचा माग काढण्यासाठी चिपळूण पोलीस आणि रत्नागिरी एलसीबीची स्वतंत्र पथके जिल्ह्याबाहेर रवाना झाली होती. संशयित आरोपी मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करत असल्याची पक्की खबर मिळताच, पोलिसांनी कोल्हापुरात सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलीस खाक्या दाखवताच त्याने नवनाथ कांबळे याचा खून केल्याची कबुली दिली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार असून, हत्येमागील नेमकं कारण आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा धागा आणि तांत्रिक कौशल्य
घटनास्थळी आरोपीचा माग काढण्यासाठी कोणताही प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध नसल्याने तपासाची दिशा ठरवणे कठीण होते. अशा परिस्थितीत पोलिसांनी तांत्रिक तपासावर लक्ष केंद्रित केले. रेल्वे स्थानक परिसरापासून थेट महामार्गापर्यंतच्या सुमारे ५० ते ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज बारकाईने तपासण्यात आले. यासोबतच ३० ते ४० संशयितांचे कॉल डिटेल्स (CDR) मिळवून त्यांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. या सलग आणि अचूक तपासातून संशयिताचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले.
तपास पथकाचे कौतुक; ३० हजारांचे पारितोषिक जाहीर
गुंतागुंतीच्या आणि किचकट प्रकरणाचा दिवसरात्र मेहनत घेऊन छडा लावल्याबद्दल अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तपास पथकाचे विशेष कौतुक करत ३० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस आणि परिविक्षाधीन उपअधीक्षक अभिजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, सपोनि राजेश जाधव, उपनिरीक्षक विकास निकम, ओम आढाव तसेच कर्मचारी अमोल यादव, विजय खामकर, विशाल शेटकर, अभिजित सकपाळ, संदीप माणके, रोशन पवार, शैलेश बनगे, रुपेश जोगी, वैभव जाधव, प्रतीक रहाटे आणि संतोष कदम यांनी ही धडाकेबाज कामगिरी बजावली आहे.


