(मंडणगड/ रत्नागिरी)
जंगलातील विषारी फळ खाल्ल्याने प्रकृती बिघडलेल्या ६५ वर्षीय महिलेचा रत्नागिरीतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. लक्ष्मी पांडुरंग निमदे (वय ६५, रा. तिडे, निमदेवाडी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी निमदे यांनी जंगलातील विषारी ‘रामानंद’ फळ खाल्ल्याने त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांना उपचारासाठी मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर १ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरीतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार रुग्णवाहिकेतून त्यांना रात्री सुमारे ८.१५ वाजता सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
सिव्हील हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र ५ ऑक्टोबर रोजी पहाटे २.११ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी त्यांचे पुत्र प्रकाश पांडुरंग निमदे यांनी दिलेल्या माहितीनुसार मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १९/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ नुसार नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून या घटनेची पुढील कार्यवाही सुरू आहे.


