(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील चाफेरी बौद्धवाडी परिसरातून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेले ६५ वर्षीय वृद्ध बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. सिध्दार्थ लक्ष्मण पवार असे बेपत्ता व्यक्तीचे नाव असून, त्यांचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणातून अपहरण केल्याची तक्रार त्यांच्या मुलाने जयगड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम १४०(३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिध्दार्थ लक्ष्मण पवार (वय ६५, रा. चाफेरी बौद्धवाडी, ता. जि. रत्नागिरी) हे ६ ऑक्टोबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. सकाळी १० ते ११.३० वाजण्याच्या सुमारास चाफेरी बौद्धवाडी परिसरातून ते अचानक बेपत्ता झाले. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला; मात्र ते आढळून आले नाहीत. या घटनेनंतर त्यांचे पुत्र हेमंत सिध्दार्थ पवार (वय ३४, व्यवसाय—रिक्षाचालक, मूळ रा. चाफेरी बौद्धवाडी, ता. जि. रत्नागिरी; सध्या रा. गणेशनगर, डोंबिवली पश्चिम) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून सिध्दार्थ पवार यांचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, जयगड पोलिसांकडून सिध्दार्थ पवार यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यांच्या बेपत्ता होण्यामागील नेमके कारण तसेच त्यांच्याबाबत कोणती माहिती मिळते का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.


