(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोकणातील विविध हॉटेलांना लक्ष्य करत रूम पाहण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या साधारण २० ते ३० या वयोगटातील चार संशयित आरोपींचा राजापूर आणि संगमेश्वर पोलीस संयुक्तपणे शोध घेत आहेत. या टोळीने राजापूर आणि संगमेश्वर येथील हॉटेलांमधून रोकड आणि ग्राहक नोंदणी रजिस्टर लंपास केल्याचे समोर आले असून, पोलिसांनी संशयित आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज आणि फोटो पोलिसांनी जाहीर करत नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) व ३(५) अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मोबीन मुनीर शेख करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजापूर शहरानजीकच्या कोदवली पुनर्वसन वसाहतीतील ‘हॉटेल फुडलँड’ येथे सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास चार अनोळखी इसम रूम घेण्यासाठी आले होते. त्यापैकी एक इसम रूम पाहण्यासाठी हॉटेल कर्मचाऱ्यासोबत वरच्या मजल्यावर गेला. याच संधीचा फायदा घेत खाली थांबलेल्या साथीदारांनी हॉटेलमधील ग्राहक नोंदणी रजिस्टर आणि त्यामध्ये ठेवलेली सुमारे सहा हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
घटनेनंतर आरोपींनी तातडीने पलायन केले. या प्रकारानंतर राजापूर पोलिसांनी तपास सुरू केला असताना संगमेश्वर येथील ‘श्रद्धा हॉटेल अँड लॉज’वर अशाच प्रकारची घटना घडल्याचे समोर आले आहे. संगमेश्वरातील या हॉटेलमधूनही या टोळीने ग्राहक नोंदणी रजिस्टर आणि सुमारे साडेपाच हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची माहिती पुढे आली आहे.
संगमेश्वर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने नाकाबंदीचे आदेश दिले. पोलिसांची हालचाल लक्षात येताच संशयितांनी वापरलेली निळ्या रंगाची हुंडाई कार (केए ५१ एमजी ६९०५) संगमेश्वर तालुक्यातील तुरळे येथे महामार्गालगत सोडून पळ काढला.
सावर्डा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आबासो पाटील यांनी तत्काळ ही गाडी ताब्यात घेतली. गाडीच्या तपासणीदरम्यान पोलिसांना पाच मोबाईल फोन तसेच विविध हॉटेलांची ग्राहक नोंदणी रजिस्टर आढळून आली. यामध्ये आंबोली, सावंतवाडी, कणकवली आणि संगमेश्वर येथील हॉटेल रजिस्टरचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. राजापूरातील ‘हॉटेल फुडलँड’चे रजिस्टर महामार्गालगत फेकून दिल्याचेही तपासात निष्पन्न झाले असून ते पोलिसांनी जप्त केले आहे.
राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा हेतू केवळ चोरीपुरता मर्यादित नसून हॉटेलमधील ग्राहक नोंदी हस्तगत करण्यामागे आणखी गंभीर उद्देश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
दरम्यान, आरोपींनी वापरलेली कार कर्नाटक राज्यातील असल्याचे समोर आले आहे. संबंधित वाहनमालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू असला तरी अद्याप तपास लागलेला नाही. या घटनांमुळे कोकणातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बाहेरून येणाऱ्या संशयित ग्राहकांची माहिती आणि ओळखपत्रांची काटेकोर पडताळणी करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

